Maharashtra Election 2019: संदेश पारकर, अतुल रावराणे यांची भाजपामधून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:25 IST2019-10-16T15:22:40+5:302019-10-16T15:25:13+5:30
Konkan Election 2019 : संदेश पारकर, अतुल रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल आणि वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली

Maharashtra Election 2019: संदेश पारकर, अतुल रावराणे यांची भाजपामधून हकालपट्टी
कणकवली : कणकवली मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार असताना विरोधी उमेदवाराचा प्रचार करून पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी भाजपाचेसंदेश पारकर, अतुल रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल आणि वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे दिली.
जठार म्हणाले, काल मुख्यमंत्र्यांचा कणकवली दौरा झाला. यावेळी संपर्क मंत्री रवींद्र चव्हाण, कोकण संघटनमंत्री सतिष धोंड यांनी कणकवलीत येऊन या चौघांची हकालपट्टी करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार या चौघांवर पुढील सहा वर्षासाठी भाजपमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान हकालपट्टी करण्यापूर्वी या चौघांनाही जिल्ह्याचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चा करण्यासाठी कणकवलीत बोलावले होते. यात संदेश पारकर उपस्थित राहिले मात्र इतर मंडळी आली नाहीत.
दरम्यान संदेश पारकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण यांनी केला. मात्र त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. भाजपमध्ये आता संदेश पारकर आणि अतुल रावराणे हे कुठलेही नेते राहिले नाहीत. या दोघांकडे यापूर्वीदेखील कुठलीही पदे नव्हती. हे दोघेही बिन पदाचे फुल अधिकारी होते. मात्र ते आता भाजपामध्ये नाहीत, असेही जठार म्हणाले.