महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वेंगुर्लेतील मतदानयंत्रात बिघाड; कपाटाला दिलेले मत अन्य निशाणीला गेल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 15:06 IST2019-10-21T14:59:50+5:302019-10-21T15:06:34+5:30
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोंनसुरे येथील बूथ 78मधील EVM मशीनमध्ये बिघाड झाला होता.

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वेंगुर्लेतील मतदानयंत्रात बिघाड; कपाटाला दिलेले मत अन्य निशाणीला गेल्याचा आरोप
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोंनसुरे येथील बूथ 78मधील EVM मशीनमध्ये बिघाड झाला होता. या ठिकाणी कपाट निशाणीच बटन दाबल्यास ते मत सिलिंडर या निशाणीला जात होते. येथील मतदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सदर मतदान मशीन बदलण्यात आली. दरम्यान या प्रकारामुळे मतदारांची मते फुकट गेल्याचा आरोप व्यक्त करून मतदारांनी शासकीय कामकाजावर संताप व्यक्त केला, अशी माहिती शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी दिली.
दरम्यान वेंगुर्लेत दीड वाजेपर्यंत सुमारे 45% मतदान झाले. वेतोरे वरचीवाडी मतदान केंद्रात 12 वाजेपर्यंत 55% मतदान झाले होते, येथे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. भाजपात गेलेले राजन तेली हे सावंतवाडी-वेंगुर्ला मतदारसंघातून केसरकरांविरोधात लढत आहेत. तर राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या बबन साळगावकरांनीही केसरकरांच्या अडचणीत वाढ केली आहे. सावंतवाडीची जागा शिवसेनेकडे गेल्याने त्यांनी बंडखोरी केली असून, ते केसरकरांविरोधात भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. त्यामुळे सावंतवाडीचा गड कोण राखतं हे येत्या 24 तारखेला समजणार आहे.