बसस्थानकाच्या आवारात क्रिकेट खेळत छेडले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 17:44 IST2020-12-01T17:42:25+5:302020-12-01T17:44:28+5:30
mns, cricket, statetransport, kudal, sindhudurgnews मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कुडाळ बसस्थानक आवारात चक्क क्रिकेट खेळत आगळेवेगळे आंदोलन छेडत प्रशासनाचा निषेध केला. येथील बसस्थानक इमारत बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी व जनतेचा पैसा वाया घालविल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही मनसेच्यावतीने बनी नाडकर्णी यांनी दिला.

कुडाळ एसटी बसस्थानक परिसरात मनसेने क्रिकेट खेळत आगळेवेगळे आंदोलन छेडले. या आंदोलनात बनी नाडकर्णी, राजन दाभोलकर, धीरज परब, सिध्देश कुठाळे आदी सहभागी झाले होते.
कुडाळ : आगामी इशारा देऊनही दिवाळीपूर्वी कुडाळमधील बसस्थानक सुरू न केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष जे. डी. उर्फ बनी नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कुडाळ बसस्थानक आवारात चक्क क्रिकेट खेळत आगळेवेगळे आंदोलन छेडत प्रशासनाचा निषेध केला. येथील बसस्थानक इमारत बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी व जनतेचा पैसा वाया घालविल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही मनसेच्यावतीने बनी नाडकर्णी यांनी दिला.
कुडाळ बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तरी अजूनही हे बसस्थानक सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस यांचा सामना गेले कित्येक महिने करावा लागत आहे. प्रवाशांना या त्रासापासून वाचविण्यासाठी बनी नाडकर्णी यांनी दिवाळीपूर्वी बसस्थानक सुरू करा अन्यथा या आवारात क्रिकेट स्पर्धा आयोजित करू, असा इशारा दिला होता.
दिवाळी सण संपला तरीही हे बसस्थानक सुरू न केल्याने शनिवारी सकाळी एसटी प्रशासनाच्या कारभाराविरोधात बनी नाडकर्णी यांनी आंदोलन छेडले. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, धीरज परब, सिध्देश कुटाळे आदी सहभागी होते.
यावेळी या सर्वांनी बसस्थानकाच्या आवारातच क्रिकेट खेळत आगळेवेगळे आंदोलन छेडले. क्रिकेट खेळताना काही बसही काही वेळेसाठी थांबविण्यात आल्या. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाला अनेक प्रवासी, नागरिकांनीही दाद दिली. बसस्थानकाच्या कामात भ्रष्टाचार करून जनतेचा पैसा वाया गेला आहे. त्यामुळे या विरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा नाडकर्णी यांनी दिला.
हा तर अडीच कोटींचा गोठा : बनी नाडकर्णी
अद्याप या बसस्थानकातून बससेवा सुरू नाही. मात्र, रात्रीचे अवैद्य धंदे सुरू असतात. सकाळी बसस्थानकावर गाई, म्हशींचा वावर जास्त असतो. त्यामुळे अडीच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बसस्थानकाची इमारत ही बसस्थानकापेक्षा अडीच कोटींचा गोठा असल्यासारखी वाटते, असा टोलाही बनी नाडकर्णी यांनी लगावला आहे.