Satara Politics: पाटणकर सरकारांचं ठरलं, भाजपचं 'कमळ' हेरलं!
By प्रमोद सुकरे | Updated: June 9, 2025 11:58 IST2025-06-09T11:57:30+5:302025-06-09T11:58:09+5:30
नव्या जिल्हाध्यक्षांच्या इनिंग मधील पहिला मोठा धमाका

Satara Politics: पाटणकर सरकारांचं ठरलं, भाजपचं 'कमळ' हेरलं!
प्रमोद सुकरे
कऱ्हाड: गेल्या अनेक महिन्यांपासून'तळ्यात- मळ्यात' सुरू असणाऱ्या पाटणकर सरकारांचं अखेर पक्षबदलाचं ठरलं आहे. आता 'भाजप'चं 'कमळ' त्यांनी हेरलं आहे. मंगळवार दि. १० रोजी मुंबईत युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचं 'कमळ' हातात घेणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात हा नवा राजकीय भूकंप मानला जात आहे.
खरंतर पाटण तालुक्यात लोकसभा निवडणुकी पूर्वीपासून राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू होत्या. पाटण विधानसभा मतदारसंघात तशा हालचाली, घडामोडी दिसून येत होत्या. राजकीय अभ्यासक या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अलीकडच्या काही दिवसात या हालचाली खूपच गतिमान झाल्या असून मंगळवारी हा राजकीय भूकंपाचा धक्का निश्चित मानला जातोय.
शरद पवारांचे निष्ठावंत पाईक म्हणून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची ओळख आहे. थोरल्या पवारांनी नेहमीच त्यांना ताकद दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. पण अलीकडच्या काही वर्षात 'वाड्यावर'चा कारभार बंद होवून तो 'कारखान्या'वरून होऊ लागला आहे. त्यामुळे पाटणकर समर्थकांच्यात अस्वस्थता वाढली आहे. कार्यकर्त्यांची हीच अस्वस्थता लक्षात घेऊन पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजप प्रवेशाचा मार्ग चोखाळला आहे.
कार्यकर्त्यांची मते आजमावली
गत १५ दिवसांपूर्वी पाटणकरांनी आपल्या मावळ्यांना वाड्यावर येण्याचं आवातनं दिलं. त्यावेळी उपस्थितांसमोर मतदारसंघातील परिस्थिती आणि भविष्यातील वाटचालीसाठी आपण नेमकं काय करावं? याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशसाठी ग्रीन सिग्नल दिला होता.
नव्या जिल्हाध्यक्षांच्या इनिंग मधील पहिला मोठा धमाका
कराड दक्षिणेचे विद्यमान आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडे पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची धुरा नुकतीच दिली आहे. ते जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पण जिल्हाध्यक्ष या नात्याने मतदारसंघाबाहेरचा हा पहिलाच मोठा पक्ष प्रवेश होणार असल्याने तो त्यांच्या इनिंग मधला मोठा धमाका मानला जात आहे.