मोक्कातून बाहेर पडताच बारमध्ये जबरी चोरी, खंडणीचाही गुन्हा
By नितीन काळेल | Updated: June 12, 2023 20:08 IST2023-06-12T20:07:30+5:302023-06-12T20:08:23+5:30
सातारा शहराजवळील दोघांना अटक.

मोक्कातून बाहेर पडताच बारमध्ये जबरी चोरी, खंडणीचाही गुन्हा
नितीन काळेल
सातारा : येथील नवीन औद्योगिक वसाहतीतील बारमध्ये खंडणीची मागणी करुन तोडफोड करत गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने नेणाऱ्या दोघांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या. हे दोघेही शहर परिसरातील असून मोक्काच्या कारवाईतून बाहेर आले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ८ जून रोजी रात्रीच्या वेळी साताऱ्यातील नवीन आैद्योगिक वसाहतीतील एक बारमध्ये मोक्काच्या केसमधून बाहेर आलेले सराईत आरोपी गेले होते. तेव्हा त्यांनी बार चालकास खंडणी मागितली. चालकाने नकार दिल्यानंतर बारमध्ये तोडफोड करण्यात आली आणि जबरदस्तीने गल्ल्यातील पैसे नेण्यात आले. तसेच एका आईस्क्रीम विक्रेत्यालाही दमदाटी करुन त्याच्या गाडीचे नुकसान केले होते. याप्रकरण बार चालक अनिल परशुराम मोरे (रा. बेबलेवाडी, ता. सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली. त्यानंतर गुन्हा नोंद झाला होता.
हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानुसार शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुख्य आरोपीबरोबर एका साथीदारास अटक केली. निकेत वसंत पाटणकर (वय ३०) आणि गणेश धनंजय ननावरे (वय २५, दोघेही रा. चंदननगर, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अनिल वाघमोडे, हवालदार सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, विक्रम माने, संतोष कचरे, सागर गायकवाड, सुशांत कदम, गणेश घाडगे, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला.