सूर्य कोपला; सातारा जिल्ह्यातील फलटणचा पारा ४४ अंशांवर पोहोचला, आरोग्य विभाग सुस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:33 IST2025-04-30T14:32:53+5:302025-04-30T14:33:14+5:30
फलटण : सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना आता फलटणच्या पाऱ्याने यंदाच्या हंगामातील सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. ...

सूर्य कोपला; सातारा जिल्ह्यातील फलटणचा पारा ४४ अंशांवर पोहोचला, आरोग्य विभाग सुस्त
फलटण : सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना आता फलटणच्या पाऱ्याने यंदाच्या हंगामातील सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सूर्यनारायण कोपल्याने नागरिक अक्षरश: घामाघूम झाले असून, उन्हाचा बाजारपेठेवरही परिणाम दिसू लागला आहे.
एप्रिल महिना सुरू झाल्यापासून फलटणचा पारा सातत्याने वाढत आहे. आठ दिवसांपूर्वी पारा ४२ अंशांवर पोहोचला होता. जो यंदाच्या हंगामातील उच्चांक होता. मात्र, मंगळवारी शहराचा हा उच्चांक मोडीत काढत ४४ अंशांवर स्थिरावला. उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने शहरातील रस्ते, मुख्य बाजारपेठ दुपारच्या सुमारास ओस पडत आहेत. गर्दीने गजबजणाऱ्या ठिकाणांवर दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत शुकशुकाट पसरत आहे.
अधिकारी अनभिज्ञ
फलटणला उच्चांकी तापमानाची नोंद होत असली तरी प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. उलट प्रशासनाकडे उच्चांकी तापमानाची कोणतीही नोंद नाही. याबाबत कृषिविभाग, फलटण पालिका, तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते.
आरोग्य विभाग सुस्त
राज्यासह फलटण शहरात उष्णतेची लाट पसरली असताना आरोग्य विभागाने नागरिकांना सूचना व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आपत्कालीन व्यवस्था म्हणून प्रशासनाने मदत केंद्र सुरू करणे क्रमप्राप्त आहे; परंतु आरोग्य विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.