Satara: बावधनमध्ये घुमला ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर, बगाड यात्रा उत्साहात; परदेशी पाहुण्यांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:07 IST2025-03-20T13:06:40+5:302025-03-20T13:07:09+5:30
बावधन : तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक बगाड यात्रा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. राज्यभरातून आलेल्या ...

Satara: बावधनमध्ये घुमला ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर, बगाड यात्रा उत्साहात; परदेशी पाहुण्यांची हजेरी
बावधन : तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक बगाड यात्रा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते बगाडाचे पूजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी केलेली गुलालाची उधळण, ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर अन् पारंपरिक वाद्याच्या गजराने आसमंत दणाणून गेला.
बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सोनेश्वर याठिकाणी बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर बगाड्याचा मान मिळालेल्या अजित ननावरे यांना कृष्णा नदीत विधिवत स्नान घालण्यात आले. यानंतर त्यांना वाजतगाजत बगाडाजवळ नेण्यात आले.
येथे पारंपरिक पोशाख घालून बगाडास टांगण्यात आले. सकाळी साडेअकरा नंतर बगाडाचा गाडा ओढण्यास सुरुवात झाली. ठिकठिकाणी विसावा घेऊन बगाड ओढणाऱ्या बैलजोड्या बदलण्यात आल्या. बगाडाच्या मागे असलेल्या ग्रामदेवतांच्या पालख्यांचे भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
दुपारी एकच्या दरम्यान बगाडाची चाके शेतात रुतली होती. शीडही थोडे कलले होते. त्यामुळे शीड खाली उतरविण्यात आले. दुपारी दोन वाजता शेड पुन्हा बघाडावर चढवून मिरवणूक सुरू झाली. दुपारी एकच्या दरम्यान बगाडाची चाके शेतात रुतली होती. शीडही थोडे कलले होते. त्यामुळे शीड खाली उतरविण्यात आले. दुपारी दोन वाजता शेड पुन्हा बघाडावर चढवून मिरवणूक सुरू झाली.
सायंकाळी साडेपाच वाजता बगाड शेतशिवारातून पक्क्या स्त्यावर आले. नंतर ते वाई सातारा रस्त्यावर आले आणि रात्री आठ वाजता बावधन गावात पोहोचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला. या सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, याची प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
परदेशी पाहुण्यांची हजेरी
बगाड यात्रेला राज्यभरातील भाविकांनी हजेरी लावली तसेच ब्राझील येथील काही पर्यटकही यात्रा पाहण्यासाठी आले होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा पाहून पर्यटकही भारावून गेले. अनेकांनी हा भक्ती व शक्तीचा हा साेहळा आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला.