गणराया एक काम कर, मोठ्या आवाजाची भिंत आता हद्दपार कर; साताऱ्यातील जेष्ठ नागरिकांचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 15:54 IST2025-08-23T15:52:46+5:302025-08-23T15:54:34+5:30

पंचमुखी गणेश मंदिरात केली महाआरती

Senior citizens of Satara performed Maha Aarti at Panchmukhi Ganesh Temple to demand ban on DJ Sound system | गणराया एक काम कर, मोठ्या आवाजाची भिंत आता हद्दपार कर; साताऱ्यातील जेष्ठ नागरिकांचे साकडे

संग्रहित छाया

सातारा : गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सोहळा; पण यंदाच्या उत्सवात साताऱ्यातील ज्येष्ठांच्या मनाला एक वेगळीच हुरहूर लागली आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा आणि कानांना त्रास देणारा डीजेचा आवाज त्यांच्या शांततेला आव्हान देत आहे. म्हणूनच, या वेदनेला वाचा फोडण्यासाठी शहरातील विविध १६ संघटनांच्या सदस्यांनी एकत्र येत शुक्रवारी सकाळी आपल्या भावना थेट गणपती बाप्पासमोर मांडल्या. पंचमुखी गणेश मंदिरात महाआरती करून त्यांनी डीजे बंदीची भावनिक सादही घातली.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये घुमणाऱ्या डीजेच्या भीषण आवाजाने ज्येष्ठांची अक्षरशः झोप उडवली आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा आवाज ज्येष्ठांसाठी धोकादायक ठरत आहे. लहान मुलांच्या कानांवरही याचा वाईट परिणाम होत आहे. शांततेत, भक्तिभावाने साजरा होणारा हा उत्सव कर्कश आवाजामुळे एक आरोग्यसंकट बनत आहे. त्यामुळे सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध १६ संघटनांनी एकत्र येत डीजे बंदीविरोधी मोहीम सुरू केली आहे.

या ज्येष्ठांनी डीजे बंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रदूषण मंडळालाही निवेदन दिले होते. शहरात मोठा मोर्चा काढला; पण त्यांच्या विनंतीची प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. यामुळेच, त्यांनी आता थेट विघ्नहर्त्याकडे धाव घेतली आहे. डीजे बंदीची हाक देतानाच शांततेत आणि भक्तिभावाने केलेली आरती किती प्रभावी असते, हे आम्ही या महाआरतीतून दाखवून दिले, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केला.

प्रशासन आणि मंडळ साथ देतील ?

डीजेचा प्रश्न आता केवळ एका शहरापुरता मर्यादित प्रश्न न राहता, तो एक सामाजिक आंदोलन बनत चालला आहे. आता जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून या भावनिक आवाहनाला प्रतिसाद मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्येष्ठांच्या या मागणीला योग्य तो मान मिळून, गणेशोत्सव पारंपरिक आणि आरोग्यपूर्ण पद्धतीने साजरा होईल का? हा प्रश्नच आता सर्वांच्या मनात आहे.

Web Title: Senior citizens of Satara performed Maha Aarti at Panchmukhi Ganesh Temple to demand ban on DJ Sound system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.