चाकणच्या व्यावसायिकाला पिस्तूल दाखवून स्क्राॅर्पीओ पळवली
By दत्ता यादव | Updated: February 23, 2023 20:33 IST2023-02-23T20:33:50+5:302023-02-23T20:33:58+5:30
साताऱ्यातील धक्कादायक घटना; अनोळखी चाैघांवर दरोड्याचा गुन्हा

चाकणच्या व्यावसायिकाला पिस्तूल दाखवून स्क्राॅर्पीओ पळवली
सातारा : गाडी खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून चार लाखांची स्क्राॅर्पीओ पळवून नेल्याची धक्कादायक घटना दि. २१ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास साताऱ्यातील बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैकात घडली. याप्रकरणी चारजणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवनाथ नामदेव भुजबळ (वय ३५, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांचा गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. सोशल मीडियावर गाडी विक्रीची जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. स्क्राॅर्पीओ गाडीचा व्यवहार ४ लाख १० हजारांना ठरला. टोकन म्हणून त्या व्यक्तीने त्यांना दहा हजार रुपये पाठवले. उर्वरित पैसे तुम्ही साताऱ्यात गाडी घेऊन आल्यानंतर देतो, असे सांगितले. त्यानुसार भुजबळ हे दि.
२१ रोजी रात्री साडेनऊ वाजता आपल्या तीन व्यावसायिक मित्रांसमवेत दोन गाड्या घेऊन साताऱ्यात आले. बाॅम्बे रेस्टाॅरंटजवळ हे सर्वजण त्यांना भेटले. गाडीची ट्रायल घेऊन येतो, असे सांगून त्यांनी गाडीची चावी घेतली. गाडीमध्ये भुजबळ यांचे दोन मित्र बसले. गाडी कोल्हापूरच्या दिशने ट्रायल घेण्यासाठी निघाली. गाडीचा वेग वाढवल्याने गाडीमध्ये बसलेल्या भुजबळ यांच्या मित्राला शंका आली. त्याने चालत्या गाडीतून उडी मारली. तर दुसरा व्यवसायिक मित्र गाडीतच बसला होता. त्याला पिस्तूलचा धाक दाखवून गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर गाडी कोल्हापूरच्या दिशेने सुसाट निघून गेली. या प्रकारानंतर व्यावसायिक नवनाथ भुजबळ यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पथके कोल्हापूर, सांगलीला रवाना...
पिस्तूलाचा धाक दाखवून स्क्राॅर्पीओ कोल्हापूरकडे गेली आहे. त्यामुळे दरोडेखोरांना पकडण्यासाठी सातारा पोलिसांची दोन पथके सांगली आणि कोल्हापूरला रवाना झाली आहेत. संशयितांचा थांगपत्ता पोलिसांना लागला असून, लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.