खंबाटकी बोगद्यातील वाहतूक पूर्ववत; तीन तासांत धोकादायक खांब हटवले
By दत्ता यादव | Updated: August 19, 2023 15:20 IST2023-08-19T15:20:21+5:302023-08-19T15:20:42+5:30
शनिवार, रविवार सलग सुट्या घेऊन पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला.

खंबाटकी बोगद्यातील वाहतूक पूर्ववत; तीन तासांत धोकादायक खांब हटवले
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगद्यात सलग दोन दिवस पडत असलेल्या खांबाची महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दखल घेऊन तीन तासात चार धोकादाय खांब हटवले. शनिवार, रविवार सलग सुट्या घेऊन पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला.
खंबाटकी बोगद्यामध्ये काही वर्षांपूर्वी विद्युत सुविधेसाठी हे खांब वरच्या बाजूला लावण्यात आले होते. मात्र, यातील काही खांब खराब झाले होते. सलग दोन दिवस वाहनांवर हे खांब कोसळत होते. मात्र, सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. कारचे मात्र, नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस तसेच भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गरजे, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, कृष्णकांत निंबाळकर, हवालदार डेरे, संतोष लेंभे या पोलिस कर्मचाऱ्यांसह पीएस टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग प्रशासनातील अधिकारी संकेत गांधी, त्यांचे कर्मचारी तसेच महामार्ग पेट्रोलिंगच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली.
मोठ्या क्रेनच्या साह्याने सलग तीन तास सर्वांनी काम करून बोगद्यातील धोकादायक खंबांची पाहणी करून त्यातील चार खांब तातडीने हटवण्यात आले. तसेच बोगद्यात वरच्या बाजूला असलेल्या इतर खांबांची स्थिती कशी आहे, याची पाहणीही महामार्ग प्रशासनाकडून करण्यात आली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. सलग सुट्यांमुळे वाहतूक वाढली आहे.
वाहनचालकांनी काळजी करू नये...
सध्या या बोगद्यामध्ये धोकादायक स्थितीत असलेले खांब काढण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित खांबदेखील लवकरच काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खंबाटकी बोगद्यामध्ये सलग दोन दिवस वाहनांवरती लोखंडी खांब पडत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु आता हे धोकादायक खांब हटविल्यामुळे वाहनचालकांनी काहीही काळजी करू नये, असे आवाहन पीएस टोलरोड कंपनीचे अमित भाटिया यांनी केले आहे.