Satara Politics: सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणारच; रामराजे यांचे समाजमाध्यमांवर स्टेटस व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:14 IST2025-02-11T16:13:10+5:302025-02-11T16:14:44+5:30

राजकारण पणाला लावण्याची चर्चा

Ramraje Naik Nimbalkar's status on social media saying You started it, I will finish it goes viral | Satara Politics: सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणारच; रामराजे यांचे समाजमाध्यमांवर स्टेटस व्हायरल

Satara Politics: सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणारच; रामराजे यांचे समाजमाध्यमांवर स्टेटस व्हायरल

फलटण : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरासह उद्योगांवरही आयकर विभागाने छापा टाकला. सलग पाच दिवस ही कारवाई चालली. यानंतर सोमवारी ( दि. १० ) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत रामराजे यांनी 'सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारच...' असे समाजमाध्यमांवर ठेवलेले स्टेटस चांगलेच व्हायरल झाले आहे. फलटण तालुक्यासह महाराष्ट्रात याबाबत चांगलीच राजकीय चर्चा होऊ लागली आहे. या स्टेटसमुळे येणाऱ्या काळात रामराजे विरोधकांबाबत आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट होत आहे.

संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी ५ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता आयकर विभागाने छापा टाकला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. तर पाच दिवस सलग आयकर विभागाकडून चौकशी सुरूच होती. रविवारी रात्री आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीची प्रक्रिया संपवली.

गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, कुरवली फुड्स, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, श्रीराम सहकारी साखर कारखाना यासह विविध उद्योगांच्या आर्थिक देवाण-घेवाणीची चौकशी सुरु होती. गेले पाच दिवस श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते ठाण मांडून होते. काल रात्री आयकर विभागाची चौकशी प्रक्रिया पूर्ण होऊन आयकर विभागाचे पथक निघून गेल्यावर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, पेढे वाटून घोषणाबाजी केली.

सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रामराजे यांनी 'सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारच..' अशा आशयाचे स्टेटस ठेवले. रामराजे यांचे स्टेटस काही वेळात सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले असून, नक्की रामराजे यांचा हा सूचक इशारा कोणाला आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले गेले.

राजकारण पणाला लावण्याची चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारणात रामराजे यांना अत्यंत जुने व मुरलेले खेळाडू मानले जाते. स्वभावाने शांत, पण वेळ आल्यावर राजकीय पटावर वर्चस्व गाजवणारे राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. आयकर विभागाच्या चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणारे रामराजे काल रात्री आयकर विभागाच्या झालेल्या चौकशीनंतर आक्रमक भूमिका घेताना दिसले. येणाऱ्या काळात राजकीय पटावर रामराजे त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द अनुभव पणाला लावून राजकीय भूमिका घेत जशास तसे उत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Ramraje Naik Nimbalkar's status on social media saying You started it, I will finish it goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.