Satara: वाईत पाहिला प्रा. संभाजीराव पाटणे यांनी १५ ऑगस्ट १९४७ चा आनंद अन् स्वातंत्र्यदिनाचा सूर्योदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:42 IST2025-08-16T19:40:58+5:302025-08-16T19:42:12+5:30

स्वातंत्र्यदिनी घडलं वाईत देशभक्तीचं अभूतपूर्व दर्शन

Prof Sambhajirao Patne witnessed the joy of 15th August 1947 and the sunrise of Independence Day in wai Satara district | Satara: वाईत पाहिला प्रा. संभाजीराव पाटणे यांनी १५ ऑगस्ट १९४७ चा आनंद अन् स्वातंत्र्यदिनाचा सूर्योदय

Satara: वाईत पाहिला प्रा. संभाजीराव पाटणे यांनी १५ ऑगस्ट १९४७ चा आनंद अन् स्वातंत्र्यदिनाचा सूर्योदय

मूळचे वाई येथील प्रा. संभाजीराव पाटणे हे (वय : ८९) साताऱ्यात वास्तव्याला आहेत. त्यांचा जन्म नोव्हेंबर १९३६ मध्ये झाला. त्यांचे बालपण व शिक्षण वाईत झाले. तेथेच त्यांनी देश स्वतंत्र झाल्याचा तो दिवस पाहिला. तेव्हा ते ११ वर्षांचे होते. त्यांनी जागविलेल्या स्वातंत्र्यादिनाच्या आठवणी, त्यांच्याच शब्दांत..

सातारा : १५ ऑगस्ट १९४७ चा तो दिवस, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा वाईत अभूतपूर्व असा साजरा झाला. त्यासाठी मुलांनी रात्रभर कमानी उभारल्या होत्या. वाईत सकाळी भाजीमंडईत झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू झाला अन् देश गुलामगिरीतून मुक्त झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आले.

वाईतील ११ नंबरच्या शाळेत आम्ही पाचवीमध्ये शिकत होते. स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्र सेवा दलाची वाई शाखा भरत होती. त्यात मी जात होतो. ३० ऑगस्ट १९४४ ला वडील सखाराम बळवंत पाटणे हे महात्मा गांधीजींना पाचगणीवरून वाईत घेऊन आले होते. त्या ठिकाणी प्रथम महात्मा गांधी यांचे दर्शन झाले. ब्राह्मो समाज संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांना पाहता आले. राष्ट्र सेवा दलात राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य, पारतंत्र्याची भूमिका, इंग्रजांची गुलामगिरी, पारतंत्र्याचे तोटे समजून आले.

१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री बाराच्या सुमारास देशाला स्वातंत्र्य मिळणार होते. तेव्हा आम्ही राहात असलेल्या परिसरात आमच्या पेक्षा मोठ्या मुलांनी कमानी उभारल्या. त्यासाठी अशोक व आंब्याच्या झाडाची पाने कमानीला लावण्यात आली होती. तसेच मुलांनी व ग्रामस्थांनी गावातील रस्ते स्वच्छ केले होते. सर्वत्र रांगोळी काढण्यात आलेली. १५ ऑगस्टच्या सकाळी भाजीमंडई या ठिकाणी झेंडावंदन ठरले होते. या झेंडावंदन कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक आप्पाशास्त्री सोहनी, काकासाहेब देवधर, रामभाऊ मेरूरकर, शंकरराव जेजुरीकर, तसेच स. ब. पाटणे हे उपस्थित होते.

आजही आठवणींनी ऊर भरून येतो..

आमच्या शाळेतील मुलांना लिमलेटची गोळी, चॉकलेट आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आलेले. तसेच तेथे बिल्लेही विकायला आले होते. त्यावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चित्र होते. त्याच वेळी वाईमध्ये सामुदायिकरीत्या जिलेबी तयार करूनही वाटण्यात आली होती. या आठवणींनी आजही ऊर भरून येतो. 

शिवरायांकडून स्वराज्याची ज्योत प्रज्वलित..

देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. अनेकांचं रक्त सांडलं, काहींना घरेदारे सोडून भूमिगत व्हावं लागलं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे बीज छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसांच्या मनात प्रज्वलित केलेल्या स्वराज्याच्या ज्योतीत होते. या ज्योतीनेच स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटली. शिवरायांच्या स्वराज्याची प्रेरणा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी उपयुक्त ठरली.

शब्दांकन - नितीन काळेल

Web Title: Prof Sambhajirao Patne witnessed the joy of 15th August 1947 and the sunrise of Independence Day in wai Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.