माथेरानच्या धर्तीवर कोयनानगरला वाफेवर चालणारी रेल्वे; पर्यटनासाठी पाटणला ७० कोटी मंजूर, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:54 IST2025-09-20T11:54:09+5:302025-09-20T11:54:34+5:30

निवडणुकीला जातीय वळण नको

Patan gets Rs 70 crore for tourism, says Guardian Minister Shambhuraj Desai | माथेरानच्या धर्तीवर कोयनानगरला वाफेवर चालणारी रेल्वे; पर्यटनासाठी पाटणला ७० कोटी मंजूर, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती

माथेरानच्या धर्तीवर कोयनानगरला वाफेवर चालणारी रेल्वे; पर्यटनासाठी पाटणला ७० कोटी मंजूर, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती

सातारा : राज्य शासनाने पाटण तालुक्यातील पर्यटनाच्या नवीन पाच प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यासाठी ७० कोटींचा निधी मंजूर केला असून, एका महिन्यात कामाला सुरुवात होईल. कामे पूर्ण झाल्यानंतर महाबळेश्वर-पाचगणीप्रमाणे पाटण तालुक्यातही पर्यटक आकृष्ट होतील. तसेच माथेरानच्या धर्तीवर वाफेवर चालणारी रेल्वे कोयनानगरला आणि महाबळेश्वर-तापोळा मार्गावरही सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

सातारा येथील पालकमंत्री कार्यालयात देसाई यांची शुक्रवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आदी उपस्थित होते. देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात विविध ठिकाणी निसर्ग पाहण्यासाठी गॅलरी, अत्याधुनिक विश्रांतीगृह, स्पोर्टसचे उपक्रम असतील. या सर्व प्रकल्पांना ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहे.

निवडणुकीला जातीय वळण नको

खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरीने आनंद दिघे यांचा फोटो शिंदेसेना वापरत असल्याबद्दल आक्षेप घेतला. यावर बोलताना देसाई म्हणाले, आनंद दिघे हे शिवसेनेत काम करत होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य सेनेत घालवले. बाळासाहेब ठाकरे यांनीही दिघे यांचे काैतुक केले होते. संजय राऊत हेच पहिले गद्दार आहेत. पदासाठी उद्धव ठाकरे यांना आघाडी करायला लावली, असे जोरदार प्रत्युत्तर दिले. तर मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या प्रश्नावर त्यांनी राज्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. विनाकारण निवडणुकीला जातीय वळण देऊ नका. सर्व समाजानेच समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे स्पष्ट केले.

पडळकर यांचे वक्तव्य चुकीचे..

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रश्नावर देसाई म्हणाले, मला वैयक्तिक असे वाटते की, पडळकर यांचे ते वादग्रस्त वक्तव्य १०० टक्के चुकीचे आहे. जो शब्द त्यांनी वापरला तो आम्हीही वापरू शकत नाही. तो शब्द खटकणारा आहे.

असा पर्यटन विकास आराखडा..

  • कुसवडे - कारवट : ६ कोटी ७० लाख रुपये.
  • कोयना - रासाटी : १५ कोटी ११ लाख.
  • मेंढघर विश्रामगृह : १८ कोटी ७८ लाख.
  • पानेरी : ४ कोटी ८१ लाख.

Web Title: Patan gets Rs 70 crore for tourism, says Guardian Minister Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.