'Narendra Modi, remove Shah from political horizon' | 'नरेंद्र मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा'
'नरेंद्र मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा'

सातारा : किसान मरे तो चुनाव का मुद्दा, जवान मरे चुनाव का मुद्दा क्यों नही हो सकता, असं धडधडीत विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यामुळे केवळ राजकीय फायद्यासाठीच आमचे ४० जवान पुलवामात ठार केले गेलेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.
मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा. देशाला गुलामगिरीत लोटू पाहणाऱ्या मोदी आणि अमित शहा या जोडीपासून महाराष्ट्र बेसावध राहिला तर लोकांचं जीणं हराम होईल, अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.
सातारा शहरातील गांधी मैदानावर आयोजित जाहीर सभेत राज म्हणाले, पाच वर्षांत मोदी व अमित शहा यांनी जो गोंधळ घालून ठेवला आहे, त्यामुळे देश पूर्णपणे अडचणीत आला आहे. देशातील साडेपाच कोटी लोकांना मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बेरोजगार व्हावे लागले. याच पाच वर्षांत १४ हजार शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांना कंटाळून आत्महत्या केल्या. देशातील अत्याचार थांबलेले नाहीत. तरुणांच्या हातचे काम काढून घेतले गेले.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे देशात हुकूमशाही आणू पाहत आहेत. लोकांना गुलाम म्हणून त्यांना वागवायचे आहे. देशात मोदी आणि शहा यांची हिटलरशाही आणू द्यायची नसेल तर कुठल्याही परिस्थितीत त्यांना राजकीय मदत होऊ द्यायची नाही. तसेच त्यांना मदत करतील, अशा लोकांच्या पाठीशीही राहायचे नाही, असे आवाहनही ठाकरे यांनी शेवटी केले.
बेसावध राहिल्यानेच महाराष्टÑ अंधारात
मोगलांच्या विरोधात पहिला आवाज उठविणारा महाराष्ट्र होता. ब्रिटिशांविरोधात आवाज उठविणाराही महाराष्ट्र होता. मग, मोदी आणि शहांविरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र का पुढे नसेल?, असा सवाल करतानाच राजा रामदेवराय यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्र अंधारात होता. कारण महाराष्ट्र बेसावध राहिला आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की बेसावध राहू नका. मोदी आणि शहा तुमचं जगणं हराम करू शकतात, असेही राज ठाकरे म्हणाले.
आमदार परिचारकांवर कारवाई का नाही
भारतीय जनता पार्टीचा आमदार परिचारक हा जवानांच्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द काढतो, तरीही भाजप त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही. त्याची आमदारकी कायम राहते आणि हाच परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो. हेच मोदी म्हणाले होते की, व्यापारी हा सैनिकांपेक्षा जास्त शूर असतो. ही त्यांची जवानांबद्दलची आस्था आहे का, असा सवालही ठाकरे यांनी केला.
>पोलिसांसमोर पैसे वाटले जाताहेत
निवडणुकीमध्ये भाजपचे लोक खुलेआम पोलिसांसमोर पैसे वाटत असल्याचा जाहीर आरोप राज ठाकरे यांनी केला. पोलिसांना नोकरी जाण्याची भीती असल्याने तेही कारवाई करत नाहीत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
>आरडीएक्स आले कुठून?
पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात तब्बल ४० जवान मारले गेले. या हल्ल्यासाठी आरडीएक्स वापरले गेले होते. हे आरडीएक्स आले कुठून? याचे उत्तर मोदींनी द्यावे, असे आव्हानही राज ठाकरे यांनी दिले.


Web Title: 'Narendra Modi, remove Shah from political horizon'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.