महाविकास आघाडीवर टीका करताना महेश शिंदेंची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 20:49 IST2023-06-01T20:49:38+5:302023-06-01T20:49:51+5:30
अकलेचे तारे तोडल्याची सर्वसामान्यांमधून जोरदार टीका

महाविकास आघाडीवर टीका करताना महेश शिंदेंची जीभ घसरली
सातारा : खासदार शरद पवार यांची भूमिका ही अंगठ्यासारखी तर संजय राऊत यांची भूमिका ही खंडीच्या वरणात...करणाऱ्या सारखी आहे. त्यातील मधले बोट हे उद्धव ठाकरे असून आजूबाजूला नाना पटोले आणि अजित पवार आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना दाबून टाकले आहे. त्यामुळे ही मूठ आवळल्यानंतर वज्रमूठ न होता वज्र... होते. अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी केली. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने सर्वसामान्यांमधून महेश शिंदेंवरही टीका होत आहे.
कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे सध्या महाविकास आघाडीवर टीका करण्याची कामगिरी बजावत आहेत. मात्र, हे करत असताना गुरुवारी त्यांची जीभ घसरली. महाविकास आघाडीवर त्यांनी अशलाघ्य शब्दात टीका केली. त्यामुळे लोकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. महेश शिंदे म्हणाले, वज्रमुठीतील अंगठा हा कधी आत असतो तर कधी बाहेर असतो. ही शरद पवार यांची निशानी आहे. कोणाला कधी ठेंगा दाखविलेलेही कळत नाही. हाताचे शेवटचे बोट सर्वांना माहिती आहे. त्याला करंगळी म्हणतात. त्याचा अर्थही सर्वांना माहिती आहे.
खंडीच्या वरणा...करणाऱ्या संजय राऊतांचे ही चिन्ह आहे. राहिली तीन बोटे त्यातील बिचारे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे आहेत. उजव्या बाजूला नाना पटोले आणि डाव्या बाजूला दुसरे पवार साहेब आहेत. या दोघांच्यामध्ये दाबून दाबून काय अवस्था झाली असेल ते बघा. हे पाच जेव्हा एक येतात तेव्हा वर्जमूठ होतच नाही. त्यामुळे जनता त्यांना काही स्वीकारणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललेले हे दमदार चाललेले आहे. त्यामुळे सामान्य आणि गोरगरीबांची सेवा करणारे सरकार आहे. २०२४ ला महाराष्ट्रातून खासदारकीला ४५ जागा आणल्या जातील असा निर्धार व्यक्त करण्यासही ते विसरले नाहीत.