Vidhan Sabha Election 2024: सातारा जिल्ह्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उच्चांकी मताधिक्य, दिग्गजांचा पराभव करत तीन नवे आमदार
By सचिन काकडे | Updated: November 25, 2024 13:10 IST2024-11-25T13:09:40+5:302024-11-25T13:10:17+5:30
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रमही केला

Vidhan Sabha Election 2024: सातारा जिल्ह्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उच्चांकी मताधिक्य, दिग्गजांचा पराभव करत तीन नवे आमदार
सचिन काकडे
सातारा : सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला भुईसपाट करून महायुतीने आठही विधानसभा मतदारसंघांत आपले वर्चस्व निर्माण केले. महायुतीचे सर्व आमदार या निवडणुकीत मताधिक्याने निवडून आले असले तरी या सर्वांमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कमी मतदान होऊनही मताधिक्यात आघाडी घेत ‘दमदार आमदार’ असल्याचे सिद्ध केले आहे.
सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत यंदा चुरशीने मतदान झाले. सर्वाधिक ७७.६४ टक्के मतदान कोरेगाव तर सर्वात कमी ६३.६३ टक्के मतदान सातारा-जावळी मतदारसंघात झाले. मतदान कमी झाल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते; परंतु शिवेंद्रसिंहराजे यांच्या मताधिक्यावर याचा कोठेही परिणाम न झाल्याचे दिसले. आजवरच्या आमदारकीच्या निवडणुकीत ते सर्वाधिक १ लाख ४२ हजार १२४ मतांनी निवडून आले.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील महायुतीच्या एकाही उमेदवाराला मताधिक्याचा इतका मोठा आकडा गाठता आला नाही. कमी मतदान होऊनही शिवेंद्रसिंहराजे यांच्या पारड्यात १ लाख ७६ हजार ८४० इतकी विक्रमी मते पडली. तसेच उद्धवसेनेचे उमेदवार अमित कदम यांचा त्यांनी तब्बल १ लाख ४२ हजार १२४ मतांनी पराभव केला.
‘आमदारकी’ची माळ पाचव्यांदा गळ्यात..
अभयसिंहराजे भोसले यांनी १९७८ ते ९५ या कालावधीत सातारा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजधानीत आमदारकीचा दबदबा कायम ठेवला आहे. २०२४ची निवडणूक जिंकत त्यांनी सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रमही केला.
जिल्ह्याला मिळाले तीन नवे आमदार..
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून भाजपचे अतुल भोसले तर कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे यांनी प्रथमच दिग्गजांचा दारुण पराभव करत आमदारकीची माळ आपल्या गळ्यात घातली. फलटण मतदारसंघातून अजित पवार गटाचे सचिन पाटील यांनी विजय मिळवत विधानसभेत पाऊल टाकले. या तीन उमेदवारांच्या रूपाने जिल्ह्याला नवे तीन आमदार मिळाले.