नगरपालिकेच्या अतिक्रमणाविरुद्ध बंद, फलटणमध्ये व्यापारी उतरले रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 15:13 IST2023-01-01T15:00:50+5:302023-01-01T15:13:10+5:30
नगरपालिका अतिक्रमण काढताना भेदभाव करत असल्याचा आरोप करीत फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड नरसिंह निकम व व्यापाऱ्यांनी आज फलटण बंदची हाक दिली होती

नगरपालिकेच्या अतिक्रमणाविरुद्ध बंद, फलटणमध्ये व्यापारी उतरले रस्त्यावर
फलटण (प्रतिनिधी )- फलटण नगर परिषदेने मनमानी पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याच्या निषेधार्थ आज फलटणमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी व्यापारी व अन्यायग्रस्त नागरिकांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला फलटण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असून हे अतिक्रमणे काढण्याचा निर्णय नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी घेतला. ज्यांची अतिक्रमणे आहेत त्यांना पूर्व नोटीस न देता तसेच ज्या मोठ्या धेंडांची अतिक्रमणे आहेत ती न काढता सर्वसामान्य व गोरगरीब व्यापारी नागरिकांची अतिक्रमणे काढल्याने फलटण शहरांमध्ये सर्वत्र संतापाच्या भावना पसरल्या होत्या.
नगरपालिका अतिक्रमण काढताना भेदभाव करत असल्याचा आरोप करीत फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड नरसिंह निकम व व्यापाऱ्यांनी आज फलटण बंदची हाक दिली होती त्याप्रमाणे आज फलटण शहरांमध्ये सकाळच्या सत्रात सर्व दुकाने बंद होती सकाळी व्यापारी व नागरिकांचा शहरातून मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला पण सहभागी झालेल्या होत्या शहरातील प्रमुख मार्गावरून शांततेत मोर्चा काढण्यात आला दुपारी दुकाने पूर्ववत उघडण्यात आली तर आज रविवारी फलटणचा आठवडी बाजार ही नेहमीप्रमाणे भरला होता.
फलटण शहरात नगरपालिकेच्या वतीने मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात आजचा बंद यशस्वी ठरला असला तरी ही लढाई यावर न थांबवितो दिनांक 2 रोजी सातारा जिल्हाधिकारी यांना सर्व व्यापारी भेटून अन्यायकारक अतिक्रमण मोहीम थांबविण्याची मागणी करणार आहे - ॲड नरसिंह निकम(अध्यक्ष फलटण तालुका संघर्ष समिती)