Satara: सह्याद्रीच्या मावळ्याने किलीमांजारोवर फडकविला तिरंगा, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:38 IST2025-09-05T15:37:50+5:302025-09-05T15:38:18+5:30
समुद्रसपाटीपासून ५८९५ मीटर (१९,३४० फूट) उंच

Satara: सह्याद्रीच्या मावळ्याने किलीमांजारोवर फडकविला तिरंगा, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर
सातारा : महाराष्ट्राच्या मातीने घडवलेल्या एका जिद्दी मावळ्याने, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत थेट आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोवर तिरंगा फडकावून साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वाई येथे जन्मलेल्या अभिजीत उल्हास भोईटे (४०) यांनी हे धाडसी काम करून दाखवले आहे.
लहानपणापासूनच गड-किल्ल्यांची आवड असलेल्या अभिजीतने महाराष्ट्रातील कळसुबाईसह अनेक शिखरे सर केली आहेत. सध्या दुबईमध्ये नोकरी करत असला तरी, किलीमांजारो सर करण्याचे त्याचे स्वप्न होते. समुद्रसपाटीपासून ५८९५ मीटर (१९,३४० फूट) उंच असलेल्या या शिखरावर चढाई करणे सोपे नाही. उणे १८ अंश सेल्सिअस तापमान, हवेतील कमी होणारा ऑक्सिजनचा साठा आणि नैसर्गिक आव्हाने यांचा सामना करत अभिजीतने आपला प्रवास सुरू ठेवला.
लिमोशु मार्गाने त्यांनी आठ दिवसांची ही मोहीम आखली. उष्ण दुबईतून थेट गोठवणाऱ्या थंडीत गिर्यारोहण करणे हे एक मोठे आव्हान होते, पण त्यांनी सुरक्षिततेची साधने आणि मार्गदर्शकाच्या सूचनांचे पालन करत हे आव्हान यशस्वीरित्या पेलले. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी आपली अंतिम चढाई सुरू केली आणि २१ ऑगस्ट रोजी किलीमांजारोच्या शिखरावर पोहोचून भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावला.
किलीमांजारो ही एक सामान्य चढाई नाही. या ट्रेकने मला विस्मयकारक निसर्ग दाखवला. भारताची पताका जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्वोच्च शिखरांवर डौलाने फडकत राहील. – अभिजीत भोईटे, गिर्यारोहक