साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा २५ फूट उंच पुतळा, खा. उदयनराजेंकडून पाहणी
By सचिन काकडे | Updated: March 16, 2025 19:02 IST2025-03-16T19:02:21+5:302025-03-16T19:02:49+5:30
छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुणे येथे या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली.

साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा २५ फूट उंच पुतळा, खा. उदयनराजेंकडून पाहणी
सातारा: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा गोडोली तळे परिसरात उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या प्रतिकृतीची रविवारी छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुणे येथे पाहणी केली. फायबरपासून बनविण्यात आलेल्या या प्रतिकृतीची आता शासनाच्या कला संचालनालयाकडून पाहणी करून अंतिम मान्यता दिली जाणार आहे.
सातारा नगरपालिका, छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान व शाहूनगरवासीयांच्या वतीने गोडोली तळे येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा २५ फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा कसा असावा, हे समजण्यासाठी पुतळ्याची सर्वप्रथम छोटी प्रतिकृती तयार करण्यात आली होती. हे काम पुणे येथील शिल्पकार संजय परदेशी यांना देण्यात आले. प्रतिकृती तयार झाल्यानंतर ती अवलोकन करण्यासाठी साताऱ्यात आणण्यात आली.
राजमाता कल्पनाराजे भोसले व खासदार उदयनराजे यांनी या प्रतिकृतीची पाहणी करून योग्य ते बदल करण्याच्या सूचना केल्या. यानंतर परदेशी यांनी सर्व बदल करून संभाजी महाराज यांचा फायबरपासून २५ फूट उंच पुतळा तयार केला. या पुतळ्याची रविवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. या प्रतिकृतीला शासनाच्या कला संचालनालयाची परवानगी मिळण्यासाठी प्रस्तावित केले जाणार आहे. परवानगी मिळालेल्या प्रतिकृतीप्रमाणे हुबेहूब ब्राँझ धातूचा भव्य पुतळा तयार केला जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.
यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हरीष पाटणे, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, शरद काटकर, काका धुमाळ, अमित कुलकर्णी, विनीत पाटील, संग्राम बर्गे, शिल्पकार संजय परदेशी, इतिहास अभ्यासक शैलेश वरखडे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.