पाचगणीत वऱ्हाडाच्या टेम्पोस अपघात; २१ जखमी, घोटेघर येथे जाताना घडली घटना
By दीपक शिंदे | Updated: February 22, 2023 18:57 IST2023-02-22T18:56:39+5:302023-02-22T18:57:32+5:30
पाचगणीत वऱ्हाडाच्या टेम्पोस अपघात झाला असून 21 जण जखमी झाले आहेत.

पाचगणीत वऱ्हाडाच्या टेम्पोस अपघात; २१ जखमी, घोटेघर येथे जाताना घडली घटना
पाचगणी (सातारा) : मांढरदेव येथून नवरदेवाच्या लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोचालकाला पाचगणीनजीक वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाला. या अपघातात २१ जण जखमी झाले असून, चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर पाचगणी येथील बेल एअर हाॅस्पिटल व महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालाना (मांढरदेव) येथील आनंदा धोंडिबा धायगुडे यांच्या मुलाचा बुधवार, दि. २२ रोजी जावळी तालुक्यातील घोटेघर येथे साडेचार वाजता विवाह होता. त्यासाठी पालाना येथून २५ वऱ्हाडींना घेऊन टेम्पो (एमएच ४३ यूव्ही ७८६०) वाई-पाचगणीमार्गे घोटेघरच्या दिशेने जात होता. भरधाव टेम्पो दुपारी एकच्या सुमारास पाचगणी येथील डॉ. निवसरकर यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या वळणाचा आला. तेव्हा वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात तो पलटी झाला. अपघात घडल्याची माहिती मिळताच पाचगणी येथील एसओएस टीमचे सदस्य, पालिका कर्मचारी व पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून गंभीर जखमींना बेल एअर हाॅस्पिटल तर किरकोळ जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
अपघातप्रवण क्षेत्र
याच ठिकाणी मागच्या महिन्यात संध्याकाळी एसटी आणि कार अपघात झाला होता. त्याच ठिकाणी आजही अपघात झाला आहे. त्यामुळे तीव्र वळण हटविण्याची मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.