Sangli: अतिक्रमण काढताना सहायक आयुक्तांना धक्काबुक्की; दोन विक्रेत्यांना वर्षाची साधी कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 11:56 IST2025-08-29T11:56:10+5:302025-08-29T11:56:53+5:30
‘तू कोण सांगणार, तुला बघून घेतो’ असे धमकावत हातगाडा अंगावर ढकलला

Sangli: अतिक्रमण काढताना सहायक आयुक्तांना धक्काबुक्की; दोन विक्रेत्यांना वर्षाची साधी कैद
सांगली : मिरजेत अतिक्रमण काढताना तत्कालीन सहायक आयुक्त संभाजी मेथे यांना धक्काबुक्की करून धमकी देणाऱ्या आरोपी कैस सलीम शेख (वय ३०), रमिज रियाज मुल्ला (वय २७, दोघे रा. माजी सैनिक वसाहत, मिरज) यांना एक वर्ष साधी कैद व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी हा निकाल दिला.
मिरज शहरातील युनिक प्लाझासमोर, सिव्हिल हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक या रस्त्यावर कैस सलीम शेख, रमिज रियाज मुल्ला यांचा मांसाहारी खाद्यपदार्थाचा गाडा बेकायदा उभा केला होता. सहा वर्षांपूर्वी दि. ३१ जानेवारी २०१९ रोजी महापालिकेचे तत्कालीन सहायक आयुक्त मेथे व त्यांचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. अतिक्रमण काढताना आरोपी कैस व रमिज या दोघांनी सहायक आयुक्त मेथे व कर्मचाऱ्यांना अडवून धक्काबुक्की केली.
मेथे यांना ‘तू कोण सांगणार, तुला बघून घेतो’ असे धमकावत हातगाडा अंगावर ढकलला. या प्रकरणी मेथे यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली होती. मिरज शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार शशिकांत पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, अतिरिक्त सरकारी वकील आर. सी. नरवाडकर व सौ. यु. बी. करवते यांनी काम पाहिले. एकूण सात साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. साक्षीदारांच्या पुराव्यावरून न्यायालयाने दोघा आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.