सांगली महापालिका निवडणुकीत 'रिक्षावाल्यां'चे चिन्हही 'ऑटो रिक्षा'च, अनोख्या योगायोगाची रंगतदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:06 IST2026-01-13T16:04:43+5:302026-01-13T16:06:08+5:30
प्रचारातही रिक्षाच केंद्रस्थानी

सांगली महापालिका निवडणुकीत 'रिक्षावाल्यां'चे चिन्हही 'ऑटो रिक्षा'च, अनोख्या योगायोगाची रंगतदार चर्चा
प्रसाद माळी
सांगली : काही दिवसांपूर्वी गाजलेले ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ हे गीत आता थेट राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. निमित्त ठरली आहे सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणूक! या निवडणुकीच्या रिंगणात दोन रिक्षाचालक अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना ‘ऑटोरिक्षा’ हेच चिन्ह दिल्याने सध्या शहरभर या अनोख्या योगायोगाची रंगतदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता ‘मताची वाट बघतोय रिक्षावाला’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
निवडणूक म्हटली की आरोप-प्रत्यारोप, प्रचारफेऱ्या, आश्वासनांची रेलचेल याबरोबरच काही गमतीदार, लक्षवेधी आणि वेगळ्या घटना घडतात. महापालिका निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. याच निवडणुकीतून एक आगळावेगळा, कुतूहल वाढवणारा प्रसंग समोर आला आहे. प्रभाग क्रमांक ३ ‘ड’ आणि प्रभाग क्रमांक ८ ‘ड’ येथून दोन रिक्षाचालकांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करताना या दोघांनीही चिन्हांच्या पसंतीत पहिल्या क्रमांकावर ‘ऑटोरिक्षा’ हेच चिन्ह मागितले होते. एकाने रिक्षा, कप-बशी आणि शिट्टी, तर दुसऱ्याने रिक्षा, कप-बशी आणि बॅट अशा क्रमाने पसंती नोंदवली होती. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी दोघांनाही त्यांच्या पहिल्या पसंतीनुसार ‘ऑटोरिक्षा’ हे चिन्ह बहाल केले. त्यामुळे आता त्यांच्या प्रचारातही रिक्षाच केंद्रस्थानी आली आहे.
रिक्षाच बनली प्रचारमाध्यम
निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार आपला प्रचार वेगळ्या पद्धतीने कसा उठून दिसेल, यासाठी नवनव्या शक्कल लढवतात. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. मात्र, या दोन उमेदवारांच्या बाबतीत त्यांचा व्यवसायच त्यांचा प्रचार ठरतो आहे. अनेक वर्षांपासून शहरात ‘रिक्षावाला’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या या उमेदवारांना आता वेगळे चिन्ह रुजविण्याची कसरत करावी लागणार नाही. कारण रिक्षा हीच त्यांची ओळख, रिक्षाच त्यांची ओळखपत्र आणि रिक्षाच त्यांचा प्रचारमाध्यम बनली आहे.
आठ अपक्ष उमेदवारांना ‘ऑटोरिक्षा’ चिन्ह
महापालिका निवडणुकीदरम्यान निवडणूक कार्यालयाकडून २० प्रभागांतील एकूण ८ अपक्ष उमेदवारांना ‘ऑटोरिक्षा’ हे चिन्ह देण्यात आले आहे. यामध्ये दोन उमेदवार प्रत्यक्ष रिक्षाचालक असून उर्वरित सहा अपक्ष उमेदवारांचे व्यवसाय वेगवेगळे आहेत. प्रभाग क्रमांक ३ ‘ड’, ४ ‘क’, ५ ‘क’, ७ ‘ब’, ८ ‘ड’, १६ ‘ड’, १८ ‘ब’ आणि १९ ‘ब’ या प्रभागांतील अपक्ष उमेदवारांना ऑटोरिक्षा हे चिन्ह मिळाले आहे.