Sangli: मिरजेतील ५२ वर्षांपूर्वीचा शिवरायांचा पुतळा आजही भक्कम, लोकवर्गणीतून केली होती उभारणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:26 IST2024-08-29T18:24:28+5:302024-08-29T18:26:32+5:30
मिरज : मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यातच कोसळला. मिरजेत मंगळवार पेठेत ५२ ...

Sangli: मिरजेतील ५२ वर्षांपूर्वीचा शिवरायांचा पुतळा आजही भक्कम, लोकवर्गणीतून केली होती उभारणी
मिरज : मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यातच कोसळला. मिरजेत मंगळवार पेठेत ५२ वर्षांपूर्वी लाेकवर्गणीतून उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आजही भक्कम स्थितीत उभा आहे.
दि. १५ मे १९७२ रोजी या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मिरजेतील शिल्पकार दादा ओतारी यांनी ब्रान्झ धातूपासून हा पुतळा तयार केला आहे. १९०० किलो वजनाच्या या पुतळ्यासाठी त्यावेळी एकोणसाठ हजार रुपये खर्च आला होता. पुतळा तयार करताना मिरजेतील सामान्य नागरिकांनी हातभार लावला. छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ समितीच्या त्या वेळेच्या कार्यकर्त्यांच्या कष्टातून हा पुतळा उभारला. ताराचंद शहा यांच्या प्रेरणेने शिवतीर्थ समितीचे पदाधिकारी नारायण भोंगळे, विश्वनाथ भिसे, विठ्ठलराव माळवदे, वसंत गवंडी, दत्तात्रय रानभरे यांनी पुतळा उभा करण्यासाठी परिश्रम घेतले. छत्रपतींचे एक सुंदर स्मारक गेली ५२ वर्षे भक्कम उभे आहे.
मिरजेत हा पुतळा उभारल्यानंतर दिवंगत शिवभक्त पांडुरंग अवसरे नित्य पूजा करीत असत. त्यांच्या पश्चात आजही गेली ५२ वर्षे शिवरायांची नित्यपूजा सुरू आहे. शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष सुधीर अवसरे व सहकाऱ्यांकडून नित्य पूजा करण्यात येते. मालवण येथील घटनेचा मिरजेत समस्त शिवप्रेमींनी तीव्र निषेध केला.
आजही अभेदय..
चित्रपतस्वी भालजी पेंढारकर यांची देखरेख व त्यावेळी प्रसिध्द मूर्तीकार दादा ओतारी यांची हस्तकला यातून मिरजेत साकारलेला पुतळा अभेदय आहे. १९७२ साली कात्री गल्ली'असे नावं असलेल्या मंगळवार पेठेतील शरद अवसरे यांनी सध्याच्या शिवाजी चौकात गल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी मोहीम सुरु केली. सांगलीचे भाई ताराचंद शहा यांनी शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. नारायण बोंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक समिती स्थापन झाली. शरद अवसरे, भाई ताराचंद शहा, नारायण बोंगाळे, विश्वनाथ पिसे, विठल माळवदे, वसंत गवंडी यांनी निधी संकलन केले.