Sangli Municipal Election 2026: महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:56 IST2025-12-27T18:55:45+5:302025-12-27T18:56:02+5:30
आघाडीचे गणित जुळविताना नाराजांची फौजच तयार होऊ नये, म्हणून नेत्यांकडून चर्चेच गुऱ्हाळ

Sangli Municipal Election 2026: महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेना
सांगली : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुलाखती घेऊन इच्छुकांची उत्सुकता वाढवली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) आणि उद्धव सेनेने एकत्र येण्याची तयारी केली आहे. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. काही प्रभागांमध्ये इच्छुकांपैकी एकाला निवडायचे असले तरी, उरलेले दोन-तीन लोक नाराज होत आहेत. महाविकास आघाडीचे गणित जुळविताना नाराजीची फौज तयार होऊ शकते. त्यामुळे नेत्यांकडून या चर्चेतच वेळ घालविण्याचा कल दिसत आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी आता उमेदवारीवरून सर्व पक्षांमध्ये रस्सीखेच दिसत आहे. प्रथम अर्ज भरणे, मुलाखती घेणे अशी लोकशाही पद्धत वापरून उमेदवारीसाठी कशा रांगा लागल्या हे दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून होत आहे. त्यानुसार महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेनेचे नेत्यांनी गुरुवारी एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पण या तीनही पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस - महाविकास आघाडी यांच्यात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
वाचा : उमेदवारीवरून भाजपमधील संघर्ष उफाळला, मुंबईतील बैठकीत दोन गटात वाद
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चे नेते आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील यांनी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. तर उद्धव सेनेला महापालिकेत १० जागा देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे, पण त्यावरही ठोस निर्णय झालेले नाही.
तसेच, महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही, असेही पक्षांतील काही नेते म्हणत आहेत. जागा वाटपाच्या समस्या असल्यामुळे उपयुक्त इच्छुकांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे.
लक्ष्मीअस्त्र हा एकमेव फॅक्टर
महापालिका निवडणुकीत ‘लक्ष्मीअस्त्र’ हा एकमेव महत्त्वाचा घटक मानून उमेदवार निश्चितीच्या दिशेने कल दिसत आहे. मात्र ज्यांच्याकडे लोकप्रियता आहे पण आर्थिक स्थिती भक्कम नाही, अशा उमेदवारांच्या उमेदवारीवर धोक्याची तलवार कायम असल्याचे दिसते. तर काही उमेदवार शेवटच्या टप्प्यात दबाव तंत्रज्ञान वापरू लागले असून, श्रेष्ठीकडून नावे येत असल्यामुळे पॅनलच्या संतुलनाचा समतोल बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.
सामाजिक गणितांसाठी नेते दारोदर
ज्या भागात एखाद्या समाजाचे प्रभावशाली स्थान आहे, त्या समाजाचे दिग्गज नेते मैदानात उतरण्यासाठी नेते दारोदर फिरत आहेत. इच्छुकांची संख्या खूप असली तरीही नेत्यांच्या या गणितांमुळे अडचणी निर्माण होत आहेत. समाजाची एकतर्फी मते मिळविण्यासाठी हा पद्धत उपयोगी पडते की नाही, याचा अंदाज लावता येत नाही.