Sangli: डोंगर खचले तरी वाड्या वस्त्यांचे पुनर्वसन होईना !, शिराळा तालुक्यात भूस्खलनाचा धोका कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:12 IST2025-07-21T14:12:04+5:302025-07-21T14:12:53+5:30
अतिवृष्टी झाली तर याठिकाणी मोठे नुकसान होण्याची शक्यता

Sangli: डोंगर खचले तरी वाड्या वस्त्यांचे पुनर्वसन होईना !, शिराळा तालुक्यात भूस्खलनाचा धोका कायम
विकास शहा
शिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली परीसरातील आरळापैकी, भाष्टेवस्ती, धामणकर वस्ती तसेच कोकणेवाडी, मिरुखेवाडी या वाड्या वस्त्यांचे अजूनही पुनर्वसन न झाल्याने दुर्घटनेचा धोका कायम आहे.
माळीण, वायनाडसारख्या दुर्घटना होण्याअगोदर प्रशासनाने या डोंगराखालच्या वस्त्यांचे पुनवर्सन करणे गरजेचे आहे. शिराळा तालुक्यात वाडीलगतच्या डोंगरांना भेगा पडून डोंगर खचले आहेत. अतिवृष्टी झाली तर याठिकाणी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शासनाकडून येथील नागरिकांचे कायमस्वरूपी स्थलांतर होणार का ? असा प्रश्न आहे. शिराळा पश्चिम भागातील अनेक वाड्या वस्त्यांवरही अशीच परिस्थिती आहे.
पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका कायम आहे. याठिकाणी भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती त्यावेळी कोकनेवाडी येथील डोंगर केव्हाही ढासळू शकतो, असा निष्कर्ष काढला होता. याबाबत वरिष्ठ कार्यालयास ११ नोव्हेंबर २०१९ ला माहिती ही कळविली होती. या प्रश्नाबाबत वारंवार याबाबत बैठक झाल्या. स्थलांतरासाठी जागा पाहणी झाली याबाबत प्रस्ताव पाठवला.
या नागरिकांना किती जागा देणार, कोणत्या सोयी- सुविधा द्यायच्या, अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता पुनर्वसन करण्यात येणाऱ्या जागांचे नागपूरच्या उपायुक्त दूर संवेदन उपयोजन केंद्राकडून जमिनीच्या पातळीबाबत नकाशा मागविला आहे. त्यामुळे हे पुनर्वसन यावर्षी तरी रेंगाळले आहे. २०१९ पासून पुनर्वसनाबाबत प्रश्न रेंगाळला आहे.
या ठिकाणी आहे धोका?
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मिरुखेवाडी, कोकणेवाडी, भाष्टेवाडी, काळोखेवाडी, सावंतवाडी, भिसेवाडी या डोंगराच्या पायथ्याला तर जाधववाडी ढाणकेवाडी, सावंतवाडी, येसलेवाडी गुंडेवाडी या डोंगर पठारावर वसलेल्या वाड्यावस्त्या आहेत. जळकेवाडी, बेर्डेवाडी, खोतवाडी परिसरातही थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी दरवर्षी तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. दोन - तीन वर्षांपासून येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भूस्खलनाचे संकट आहे.
पुनर्वसन होणारी कुटुंबे
कोकणेवाडी कुटुंब १०१, पुनर्वसन ठिकाण बेरडेवाडी, भाष्टेवस्ती -कुटुंब ३०, पुनर्वसन ठिकाण बेरडेवाडी, धामणकरवस्ती -कुटुंब २६, पुनर्वसन ठिकाण आरळा, मिरुखेवाडी - कुटंब १३१, पुनर्वसन ठिकाण मणदूर.
सहायक संचालक, नगर रचना, सांगली यांना नकाशे, कुटुंबाच्या यादी, नागरी सुविधा आदींची माहिती ३१ ऑक्टोबर २४ रोजी पाठवली आहे. आता जमीन पातळीचा नकाशा मागविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. सध्या पावसाचे प्रमाण वाढले, तर आवश्यकतेनुसार येथील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. याठिकाणी पूर्णवेळ शासकीय कर्मचारी नेमणूक केली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. - शामला खोत पाटील, तहसीलदार, शिराळा.