शिराळा नगराध्यक्षपद खुले': इच्छुकांच्या भाऊगर्दीने आखाडा तापणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:17 IST2025-10-07T19:16:55+5:302025-10-07T19:17:52+5:30
उमेदवार निश्चितीसाठी नेतेमंडळींची होणार तारेवरची कसरत

शिराळा नगराध्यक्षपद खुले': इच्छुकांच्या भाऊगर्दीने आखाडा तापणार
विकास शहा
शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद सर्वसाधारण (खुले) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पदावर डोळा ठेवून असलेल्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने, प्रमुख राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींसमोर उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. उमेदवारीसाठी सुरू झालेल्या तीव्र स्पर्धेमुळे शिराळ्याचे राजकीय वातावरण तापले आहे.
मागील निवडणुकीत तिरंगी लढत पाहिल्यानंतर, आता शिराळ्याच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास आली आहेत. स्थानिक पातळीवर मानसिंगराव नाईक , शिवाजीराव नाईक हे दोन गट तर सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक हे एकत्र आले आहेत. यावेळी शिंदेसेनाही गटही रिंगणात आहे त्यामुळे आता भाजप-शिवसेना एकत्रित येणार आहेत. ही लढत प्रामुख्याने 'राष्ट्रवादी-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप-शिवसेना महायुती' अशीच होण्याची दाट शक्यता आहे.
नगराध्यक्षपदासाठी प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी आहे, ज्यामुळे नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. या निवडणुकीत काही संभाव्य लढतींमुळे कौटुंबीक राजकारणही चर्चेत आले आहे.
डिजिटल नागपंचमीपासूनच मोर्चेबांधणी
नागपंचमीवेळी इच्छुक उमेदवारांनी लावलेल्या डिजिटल कमानी आणि स्वागतफलकांमुळे 'डिजिटल नागपंचमी'चा अनुभव आला होता. आता आरक्षण जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार महिलांनी नगराध्यक्षपद भूषविले होते.
मात्र, यावेळी खुल्या प्रवर्गामुळे इच्छुकांची संख्या वाढली असून, तिकीट न मिळाल्यास होणारी बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान सर्वच पक्षांच्या नेत्यांपुढे असणार आहे. खुल्या आरक्षणामुळे शिराळ्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उमेदवार निश्चितीसाठी नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार असून, कोणाला संधी मिळणार आणि कोण नाराज होणार, यावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल.