Sangli: मिरजेच्या तंतुवाद्यांची दास्तान आता दस्तऐवजात गुंफणार, राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 17:00 IST2026-02-21T16:59:33+5:302026-02-21T17:00:47+5:30
दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण काम

Sangli: मिरजेच्या तंतुवाद्यांची दास्तान आता दस्तऐवजात गुंफणार, राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल
सदानंद औंधे
मिरज (जि. सांगली) : सतारीचा मंद नाद आणि तानपुऱ्याचा स्थिर स्वर...भारतीय अभिजात संगीताची ही ओळख जपणारी वाद्ये जिथे जन्म घेतात, ते म्हणजे मिरज. गेली दीडशे वर्षे आपल्या कुशल कारागिरीच्या बळावर जगभर नाव कमावणाऱ्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती कलेचा वारसा आता लेखी स्वरूपात जतन केला जाणार आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिरजेतील सतार आणि तानपुरा या तंतुवाद्यांच्या निर्मिती प्रक्रियेचा सखोल अभ्यास करून त्याचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या पुढाकारातून सुरू झाले आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)मार्फत करण्यात येत असून, मिरजेच्या या पारंपरिक कलेचा इतिहास आणि बारकावे आता अधिकृत स्वरूपात जतन होणार आहेत.
मिरज हे तंतुवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे तयार होणाऱ्या सतार आणि तानपुऱ्यांना देश-विदेशात मोठी मागणी असून, अनेक पिढ्यांपासून शेकडो कुटुंबे या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत आहेत. मिरजेतील कारागिरांच्या कुशल हातांनी तयार होणाऱ्या या वाद्यांना पारंपरिकता, विशिष्ट नादगुणवत्ता आणि सौंदर्य लाभलेले आहे. या तंतुवाद्यांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाल्यामुळे त्यांच्या निर्यातीसही मोठी चालना मिळाली आहे.
देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीबद्दल मोठे आकर्षण आणि कुतूहल आहे. मात्र, ही कला आजही मोजक्या कारागिरांपुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यामुळे काळाच्या ओघात ही परंपरा लुप्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या भारतीय ज्ञान संवर्धन उपक्रमांतर्गत सोलापूर येथील एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ यांच्या प्रकल्पाला मंजुरी देत सुमारे अडीच लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी चार विद्यार्थी आणि चार संशोधक, असे आठ सदस्यांचे पथक तयार करण्यात आले असून, त्यांनी नुकतेच मिरजेत आठवडाभर वास्तव्यास राहून स्थानिक तंतुवाद्य कारागिरांच्या मुलाखती घेतल्या आणि वाद्यनिर्मिती प्रक्रियेचे चित्रीकरण केले.
या अभ्यासाच्या आधारे तंतुवाद्य निर्मिती कलेचा सविस्तर लेखी अहवाल तयार करून तो मार्चअखेर भारतीय ज्ञान संवर्धन विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती विश्वप्रयाग विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिझाईनच्या अधिष्ठाता रूपाली धामणे यांनी दिली.
हस्तनिर्मित तंतुवाद्यांची निर्मिती ही अत्यंत वेळखाऊ आणि कौशल्यपूर्ण प्रक्रिया असल्याने या व्यवसायात कार्यरत कारागिरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या पारंपरिक हस्तकलेतील अडचणी समजून घेऊन कारागिरांना शासनाकडून कोणत्या प्रकारे मदत करता येईल, तसेच वाद्यांचा नादगुण जपून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती प्रक्रिया सुलभ करता येईल का, यावर दुसऱ्या टप्प्यात संशोधन करण्यात येणार आहे. - रूपाली धामणे, अधिष्ठाता, विश्वप्रयाग विद्यापीठ