आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:25 IST2025-11-17T17:25:36+5:302025-11-17T17:25:58+5:30
काका गटाकडून माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असणाऱ्या 'स्वाभिमानी विकास आघाडी'च्या माध्यमातून या निवडणुकीत रिंगणात उतरण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीत आबा-काका गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत अखेरच्या दिवसापर्यंत सस्पेन्स कायम राहिला होता. मात्र आज सोमवार दि. १७ नोव्हेंबररोजी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने दोन्ही गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यासोबत सादर होणाऱ्या 'बी' फॉर्ममुळेच अंतिम उमेदवार स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तासगावच्या राजकारणातील गेल्या काही दिवसांपासूनची उत्कंठा आज सोमवारी निवळणार आहे.
काका गटाकडून माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असणाऱ्या 'स्वाभिमानी विकास आघाडी'च्या माध्यमातून या निवडणुकीत रिंगणात उतरण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
आमदार रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीदेखील तयारी पूर्ण झाली आहे. दोन्ही पक्षांकडून उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवारांना बी फॉर्म देऊन सोमवारीच अर्ज दाखल होणार आहेत. त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठीची लढत अधिक स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, हे दोन्ही गट सोडून भाजपकडून विद्या चव्हाण यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी होणाऱ्या अर्ज दाखल प्रक्रियेनंतर तासगाव नगराध्यक्ष पदाच्या लढतीचे एकंदरीत चित्र स्पष्ट होणार असून, स्थानिक राजकारणाचा थरार शिगेला पोहोचला आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्यासोबत
स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे काका गटाला काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा मिळाल्याचे चित्र उभे राहिले असून, गटबाजीच्या लढतीत ही मोठी चाल मानली जात आहे.
अखेरच्या टप्प्यापर्यंत मनोमिलनाची कुजबुज
आज सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा टप्पा असतानाही आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील या दोन्ही गटांकडून कुणीही आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे तासगाव शहरामध्ये मनोमिलनाच्या चर्चाना अजूनही उधाण आले असून, अंतिम क्षणी कुठला निर्णय येतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.