महापालिका पटावर नवी सोंगटी, बाप माणसांची राजकीय कसोटी; सांगलीत 'या' नेत्यांची मुले, पुतणे, सुना निवडणूक रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:02 IST2026-01-10T17:01:29+5:302026-01-10T17:02:50+5:30
प्रचारात दिले झोकून : मुलांच्या भवितव्यासाठी संघर्ष

महापालिका पटावर नवी सोंगटी, बाप माणसांची राजकीय कसोटी; सांगलीत 'या' नेत्यांची मुले, पुतणे, सुना निवडणूक रिंगणात
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत यंदा राजकारणातील वारसदारांची मोठी उतरंड पाहायला मिळत आहे. शहरातील विविध प्रभागांत दिग्गज नेत्यांची मुले, पुतणे, सुना थेट निवडणूक रिंगणात उतरली असून, त्यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी ‘बापमाणसांनी’ स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. भावी पिढीच्या राजकीय वाटचालीसाठी हे ज्येष्ठ नेते दिवसाची रात्र करत प्रचारात झोकून देताना दिसत आहेत.
कुठे पदयात्रा, कुठे बैठका, तर कुठे थेट मतदारांच्या दारात जाऊन गाठीभेटी घेतल्या जात आहेत. पक्षाची यंत्रणा, कार्यकर्ते आणि समर्थकांना सोबत घेऊन ज्येष्ठ नेते स्वतः मैदानात उतरल्याने निवडणूक प्रचाराला वेगळेच धारदार स्वरूप आले आहे. काही प्रभागांत तर ‘उमेदवार नव्हे, बापमाणूसच लढतोय’ अशी चर्चा रंगू लागली आहे.
महापालिकेची ही सहावी निवडणूक आहे. या काळात अनेकांनी महापालिकेच्या राजकारणात दुसरी पिढीला समोर आणले आहे. काही नेत्यांनी मुलगा, मुलगी यांना संधी दिली आहे, तर काहींनी पुतण्यावर भरवसा ठेवत राजकीय वारसांची धुरा दिली आहे. यंदाच्या निवडणुकीतही डझनभर बापमाणूस भावी पिढीच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
राजकारणातील अनुभव, संपर्क आणि प्रभाव याचा पुरेपूर वापर करून पुढील पिढीला स्थिरावण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, यामुळे घराणेशाहीचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नवख्या पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी ही स्पर्धा अधिक कठीण बनल्याची चर्चा शहरात सुरू आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत बापमाणसांच्या ताकदीवर कोणाची राजकीय वारसदारी सिद्ध होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजयासाठी दिवसरात्र परिश्रम
१. खासदार विशाल पाटील यांनी पुतण्या हर्षवर्धन याला उमेदवारी दिली आहे. त्याच्यासाठी खा. पाटील यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
२. स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी यांचे दोन्ही चिरंजीव संदीप व निरंजन पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. गतवेळी दोन्ही चिरंजीव विजयी झाले. यंदाही त्यांच्यासाठी आवटी प्रयत्न करताना दिसत आहेत.
३. माजी महापौर किशोर जामदार यांनी मुलगा करण याला गत निवडणुकीत महापालिकेच्या मैदानात उतरविले होते. यंदाही करण जामदार निवडणूक लढवीत आहे. त्याच्यासाठी किशोर जामदार मोर्चेबांधणी करीत आहेत.
४. स्थायी समितीचे माजी सभापती दिलीप सूर्यवंशी यांचे दोन्ही पुतणे धीरज व चेतन हे वेगवेगळ्या प्रभागातून लढत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी दिलीप सूर्यवंशी यांनी फिल्डिंग लावली आहे.
प्रचारासाठी झटणारे ज्येष्ठ
- विशाल पाटील : पुतण्या
- इद्रीस नायकवडी : मुलगा
- दिनकर पाटील : सून
- किशोर जामदार : मुलगा
- संगीता खोत : पुतण्या
- सुरेश आवटी : दोन मुले
- दिलीप सूर्यवंशी : दोन पुतणे
- बटूदादा बावडेकर : मुलगा
- धनपाल खोत : सून
- किरण सूर्यवंशी : सून
- मोहन व्हनखंडे : मुलगा
- सचिन कदम : सून
- हारुण खतीब : मुलगा
- रज्जाक नाईक : बहीण