मिरजेतील तंतूवाद्यांना केंद्र शासनाचे जीआय मानांकन प्रदान, देशात व परदेशात निर्यातीसाठी फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:20 IST2025-06-17T13:20:46+5:302025-06-17T13:20:59+5:30
तीन वर्षांच्या पाठपुराव्यास यश

मिरजेतील तंतूवाद्यांना केंद्र शासनाचे जीआय मानांकन प्रदान, देशात व परदेशात निर्यातीसाठी फायदा
मिरज : मिरजेतील सतार व तानपुरा या तंतूवाद्यांना केंद्र शासनाकडून जीआय (भौगोलिक ओळख) मानांकन मिळाले आहे. नाबार्डतर्फे मुंबईत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते मिरज सितार व मिरज तानपुरा या वाद्यांना जिओग्राफिकल इंडिकेशन (जी. आय.) मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले.
मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंटस् क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर व सोलट्युन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष मुबिन मिरजकर, अल्ताफ पिरजादे, सर्फराज शहापुरे यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व नेते राजेश टोपे उपस्थित होते.
दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तंतूवाद्यांना प्रथमच भौगोलिक ओळख मिळाली आहे. मिरजेत तयार होणाऱ्या तंतूवाद्यांना जीआय मानांकन मिळाल्याने या तंतूवाद्यांची आता इतरांना नक्कल करता येणार नाही. इतर ठिकाणची वाद्ये मिरजेच्या नावाने विक्री करता येणार नाहीत. यामुळे मिरजेतील तंतूवाद्यांना देशात व परदेशात निर्यातीसाठी फायदा होऊन येथील तंतूवाद्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे.
तीन वर्षांच्या पाठपुराव्यास यश
भारतीय शास्त्रीय संगीतात मिरजेत तयार होणाऱ्या तंतूवाद्यांचीही मोठी भूमिका आहे. या तंतूवाद्यनिर्मिती कलेला भौगोलिक ओळख मिळवण्यासाठी गेली तीन वर्षे प्रयत्न सुरू होते. मिरजेत दोनशे वर्षांपासून तंतूवाद्य निर्मिती सुरू असल्याच्या ऐतिहासिक कागदपत्रांची पडताळणीही यासाठी करण्यात आली. सतार व तंबोऱ्याला जीआय नामांकन मिळाल्याने यापुढील काळात मिरजेत तयार होणाऱ्या इतर वाद्यांनाही मानांकनासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ तंतूवाद्य निर्माते बाळासाहेब मिरजकर यांनी सांगितले.