शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:11 IST2025-11-17T17:10:58+5:302025-11-17T17:11:30+5:30
दुसरीकडे, माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची आघाडी झाली आहे.

शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
विकास शहा
शिराळा-शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मोठे राजकीय नाट्य घडले असून, भाजपला मोठा धक्का देत माजी नगरसेवक अभिजीत नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत येणार असून, ही लढत चुलत भाऊ असलेल्या अभिजीत नाईक आणि शिंदेसेनेचे पृथ्वीसिंग नाईक यांच्यात होणार आहे.
यातच, उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे माजी नगरसेवक केदार नलवडे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने आता ही लढत तिरंगी होणार आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने काका- पुतण्यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहे. सर्व पक्षांच्या आघाडीबाबत वरिष्ठ नेत्यांच्या मुंबई वाऱ्या सुरू असतानाच, भाजप-शिंदेसेना युतीच्या उमेदवाराची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिराळा येथे केली. त्यांनी पृथ्वीसिंग नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
दुसरीकडे, माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची आघाडी झाली आहे.
राजकीय वर्तुळाचे लक्ष
एकीकडे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची एकत्रित आघाडी आहे, तर दुसऱ्या बाजूला
आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि अॅड. भगतसिंग नाईक यांची आघाडी आहे. केदार नलवडे यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतल्याने शिराळा नगरपंचायतीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून मोर्चेबांधणीस वेग आला आहे.
नगरपंचायत निवडणुकीसोबतच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही ही युती कायम राहील, असे स्पष्ट संकेत मिळाल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपला धक्का देत अभिजीत नाईक आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती वैशाली नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात स्वगृही प्रवेश करणे, हा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचा विरोधकांना दिलेला 'मास्टर स्ट्रोक' मानला जात आहे.
पक्ष प्रवेशाने वातावरण तापले
भाजपमध्ये केदार नलावडे आणि शिंदेसेनेचे पृथ्वीसिंग नाईक यांच्यात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू होती. खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी एकत्र येऊन पृथ्वीसिंग नाईक यांना उमेदवारी दिली.
या निवडणुकीच्या वातावरणात कार्यकर्ते पक्षांतर करत आहेत. आमदार सत्यजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, तर काही कार्यकर्ते भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.