संजयकाका पाटलांना धक्का; भाजपच्या ४ नगरसेवकांनी राजीनामा देऊन सुरू केला विशाल पाटलांचा प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 14:44 IST2024-04-26T14:40:16+5:302024-04-26T14:44:52+5:30
Vishal Patil : मिरजमधील भाजप नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत विशाल पाटलांचा प्रचार सुरू केला आहे.

संजयकाका पाटलांना धक्का; भाजपच्या ४ नगरसेवकांनी राजीनामा देऊन सुरू केला विशाल पाटलांचा प्रचार
Sangli Lok Sabha ( Marathi News ) : महाविकास आघाडीतील संघर्षामुळे सांगली लोकसभा मतदारसंघाची राज्यभर मोठी चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीची ताकद विभागली गेल्याने याचा भाजप उमेदवार संजय पाटील यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आता विशाल पाटील यांनी भाजपला धक्का दिला असून मिरजमधील भाजप नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत विशाल पाटलांचा प्रचार सुरू केला आहे.
मिरजमधील भाजपच्या काही नगरसेवकांनी यापूर्वीच संजयकाका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत विशाल पाटलांना साथ देण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून बंडखोर चार नगरसेवकांच्यावर कारवाईचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. परंतु पक्षाकडून अशी कारवाई होण्याच्या आधीच भाजपचे बंडखोर नगरसेवक संदीप आवटे, निरंजन आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विशाल पाटलांची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, आणखी तीन नगरसेवकही गुप्तपणे विशाल पाटील यांनाच मदत करणार असल्याचा दावाही या बंडखोर नगरसेवकांकडून करण्यात आला आहे.
उघड व छुप्या हालचाली
नगरसेवकांसह काही भाजप नेते उमेदवारासोबतचा जुना हिशेब चुकता करण्यासाठी छुप्या राजकीय खेळ्या करू पाहात आहेत. हाच प्रकार शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गोटातही दिसून येत आहे.
वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणीचा प्रयत्न..
सांगली जिल्ह्यातील भाजपअंतर्गत छुप्या राजकीय खेळ्यांबाबतची कल्पना पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी सांगलीत आल्यानंतर संबंधित नाराज लोकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.