Sangli Municipal Election: आरक्षणाने दांडी उडाली; पत्नी, मुलगी, सुनेसाठी मोर्चेबांधणी; कोणत्या प्रभागांत होणार अडचण.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:15 IST2025-11-13T18:32:45+5:302025-11-13T19:15:00+5:30
दिग्गजांचे प्रभाग आरक्षित झाल्याने घरातच नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणी

Sangli Municipal Election: आरक्षणाने दांडी उडाली; पत्नी, मुलगी, सुनेसाठी मोर्चेबांधणी; कोणत्या प्रभागांत होणार अडचण.. वाचा
शीतल पाटील
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणेच पालटली आहेत. अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या प्रभागात महिला आरक्षण लागू झाल्याने आता स्वतःऐवजी ‘घरातील महिला उमेदवार’ मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत. काही ठिकाणी पत्नी, काही ठिकाणी मुलगी, तर काही ठिकाणी सून, अशा उमेदवारांच्या चर्चांना वेग आला आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने आता नवीन पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे. आरक्षणाने राजकीय समीकरण बिघडले असले, तरी ‘नगरसेवकपद घरातच राहिले पाहिजे’ या हट्टाने अनेकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पत्नी, मुलगी किंवा सून यांच्या उमेदवारीसाठी वेग आला आहे. काही ठिकाणी तर ‘महिलेच्या नावावर उमेदवारी, प्रचार मात्र पतीकडून’ असे दृश्य पाहायला मिळणार आहे.
गल्ल्यांपासून राजकीय पक्षांच्या कार्यालयांपर्यंत आता ‘कोणाच्या घरातून कोण महिला लढणार?’ याची चर्चा आहे. काही माजी नगरसेवकांनी पत्नींना उमेदवारीसाठी तयार केले असून, प्रचाराची रणनीती तयार होऊ लागली आहे. पक्ष पातळीवरही या नव्या समीकरणाने गोंधळ उडवला आहे. महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांच्या तिकिटावर गंडांतर आले आहे. मात्र, राजकारणात ‘घराण्याचा प्रभाव’ कायम ठेवण्यासाठी आता या नेत्यांनी महिलांना अग्रभागी आणून स्वतः मागे राहण्याचा खेळ सुरू केला आहे.
‘या’ प्रभागांत होणार अडचण
- प्रभाग नऊमध्ये दोन सर्वसाधारण महिलांसाठी जागा राखीव आहे. या प्रभागात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यात मध्यंतरी निष्ठावंत विरुद्ध आयाराम असा वाद रंगला होता. आता खुल्या गटातील इच्छुकांना महिला गटातून उमेदवारी घ्यावी लागणार आहे.
- सांगलीवाडीच्या प्रभाग १३ मध्ये सर्वात मोठी कोंडी खुल्या गटाची झाली आहे. हा प्रभाग तीन सदस्यांचा आहे. त्यात दोन महिला सर्वसाधारण आरक्षण आल्याने खुल्या गटातील उमेदवारांनी आता घरातील महिला उमेदवारांसाठी तयारी चालविली आहे.
- टिंबर एरियातील प्रभाग दहामध्ये माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. या गटात अनुसूचित जाती महिला आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे आता घरातील उमेदवार की सर्वसाधारण गटातून उमेदवारी याचा फैसला नेत्यांच्या हाती राहणार आहे.
- प्रभाग १७ मध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव आहे. या गटातून महिला उमेदवारीसाठी राजकीय पक्षांत रस्सीखेच होणार आहे.
- प्रभाग चारमध्येही ओबीसी महिला आरक्षणामुळे माजी सभापतींना खुल्या गटातून उमेदवारीचा पर्याय निवडा लागणार आहे.