सांगली महापालिकेत ३० हजार मतदार वाढले, प्रारूप यादी प्रसिद्ध; हरकतीसाठी २७ पर्यंत मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:36 IST2025-11-21T18:36:36+5:302025-11-21T18:36:54+5:30
गावभागमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी मतदार कुठे...जाणून घ्या

सांगली महापालिकेत ३० हजार मतदार वाढले, प्रारूप यादी प्रसिद्ध; हरकतीसाठी २७ पर्यंत मुदत
सांगली : महापालिकेची निवडणूक सात वर्षांनी होत आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी महापालिकेची मतदार संख्या ४ लाख २४ हजार १७९ इतकी होती. त्यात आता ३० हजार २४९ मतदारांची वाढ होऊन ४ लाख ५४ हजार ४२८ झाली आहे. लोकवस्तीची वाढ आणि नवमतदारांची भर यामुळे मतदार संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आज, गुरुवारी महापालिकेने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होत आहे. प्रत्येक प्रभागात २१ ते २७ हजार मतदार आहेत. महापालिका प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची मतदार यादी फोडून एक ते २० प्रभागांत विभागली आहे. ही मतदार यादी चार प्रभाग समिती, मुख्य निवडणूक कार्यालयासह संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२५ हजार दुबार मतदार
महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत २५ हजार दुबार मतदार आहेत. त्यात सांगलीच्या प्रभाग समिती १ मध्ये ६ हजार ६९४, प्रभाग समिती २ मध्ये ६ हजार ७०१, कुपवाडमधील प्रभाग समिती ३ मध्ये ५ हजार ५२४ तर मिरजेच्या प्रभाग समिती ४ मध्ये ६ हजार २०० मतदारांची नावे दुबार आहेत. या दुबार मतदारांच्या नावासमोर निवडणूक आयोगाने स्टार केला आहे.
गावभागमध्ये सर्वाधिक तर सांगलीत सर्वात कमी मतदार
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार, गावभागचा प्रभाग क्रमांक १४ मध्ये सर्वाधिक २७ हजार ३५८ मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार सांगलीवाडी प्रभागात १५ हजार ५१२ इतके आहेत. मिरजेत मीरासाहेब दर्गा परिसरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये सर्वाधिक २६ हजार ७८३ मतदार आहेत. त्या खालोखाल खणभाग, कुपवाड, सह्याद्री नगरमधील प्रभागांत मतदार संख्या अधिक आहे.
मतदार यादी कार्यक्रम
- हरकती व सूचना : २७ नोव्हेंबर
- अंतिम मतदार यादी : ५ डिसेंबर
- मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी : ८ डिसेंबर
- मतदान केंद्रनिहाय मतदार यादी : १२ डिसेंबर
प्रभागनिहाय मतदार संख्या प्रभाग मतदारसंघ
१ - २६३८४
२ - २१५६०
३ - २१९२०
४ - २४५३५
५ - २२९३१
६ - २६७८३
७ - २२१९८
८ - २२२१८
९ - २५८८३
१० - २३०४०
११ - २१०२६
१२ - २२३६८
१३ - १५५१२
१४ - २७३५८
१५ - २१६९५
१६ - २६५८८
१७ - २२७२०
१८ - १९७६७
१९ - २२०५८
२० - १७८८३
राज्य निवडणूक आयोगाने दुबार नावे मतदार यादीत शोधून त्यांच्यासमोर स्टार केले आहे. या दुबार मतदारांचा महापालिकेकडून शोध घेऊन त्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी केली जाईल. त्यांना एकदाच मतदान करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यांचे दुसऱ्या ठिकाणी असलेले नाव बाद करण्यात येईल. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. - स्मृती पाटील, उपायुक्त तथा नोडल अधिकारी