सांगली महापालिकेसाठी दोन दिवसांत विक्रमी ११४६ अर्जांची विक्री; एकही अर्ज दाखल नाही, उरले चारच दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:20 IST2025-12-25T19:20:13+5:302025-12-25T19:20:46+5:30
सुट्ट्यांमुळे शेवटच्या दिवसांत होणार गर्दी

सांगली महापालिकेसाठी दोन दिवसांत विक्रमी ११४६ अर्जांची विक्री; एकही अर्ज दाखल नाही, उरले चारच दिवस
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ५७२ जणांनी अर्ज घेतले. गेल्या दोन दिवसांत तब्बल ११४६ जणांनी अर्जाची खरेदी केली असून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबर असली तरी दोन सुट्ट्या वगळता आता केवळ चारच दिवस राहिले आहेत. सोमवार व मंगळवारीच अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून अर्ज दाखलची प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीसाठी महापालिकेने सहा विभागीय कार्यालये स्थापन केली आहेत. या विभागीय कार्यालयांत सकाळपासून अर्ज घेण्यासाठी इच्छुक व त्यांच्या समर्थकांची गर्दी होत आहे. त्यात अर्ज कसा भरावा, ना-हरकत दाखले कोणते, अशी विचारणा होत आहे. त्यासाठी महापालिकेने मदत कक्षही सुरू केला आहे. पहिल्या दिवशी ५७४ अर्जांची विक्री झाली होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी ५७२ जणांची विक्री झाली. आतापर्यंत ११४६ जणांनी अर्ज घेतले आहे.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता वाढली आहे.
दुसऱ्या दिवशी कुपवाड विभागातून ९८ अर्जाची विक्री झाली. या विभागात आतापर्यंत २०९ जणांनी अर्ज घेतले आहेत. मिरजेच्या मुख्य कार्यालयातून ११८, बालगंधर्व नाट्यगृह कार्यालयातून ८८, सांगलीतील प्रभाग समिती दोनच्या कार्यालयातून १२१, तरुण भारत क्रीडांगण येथील निवडणूक कार्यालयातून ७८, तर माळबंगला येथील कार्यालयातून ६९ अर्जांची विक्री झाली.
विश्रामबाग परिसरातून सर्वाधिक अर्ज
विश्रामबाग परिसरातील प्रभाग १५, १७, १८, १९ या चार प्रभागांतून सर्वाधिक २२० अर्जांची विक्री झाली आहे. त्यानंतर माळबंगला येथील कार्यालयातून प्रभाग ९, १०, ११मध्ये इच्छुकांनी २११ अर्ज घेतले आहेत. दुसऱ्या दिवशी मिरजेत अर्ज विक्रीत वाढ झाली असून १०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत.
गुरुवार, रविवारी सुट्टी
उद्या गुरुवारी नाताळ व रविवारी उमेदवार अर्ज विक्री व नामनिर्देशन दाखल करण्यास सुट्टी असेल. त्यामुळे आता इच्छुकांसमोर शनिवार व शुक्रवार, तर सोमवार व मंगळवार असे चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यात अजून उमेदवार याद्या निश्चित नसल्याने इच्छुकांनी अपक्ष व पक्षांकडून अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे.