Sangli: इंगरूळमध्ये आढळला दुर्मिळ 'ॲटलस मॉथ'; पंखांवरील नागाच्या चित्राने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:33 IST2025-09-11T16:32:31+5:302025-09-11T16:33:14+5:30

जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक, निसर्गाचा अद्भुत नमुना पाहण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांची गर्दी

Rare Atlas Moth found in Ingrul Sangli Snake pattern on wings attracts attention | Sangli: इंगरूळमध्ये आढळला दुर्मिळ 'ॲटलस मॉथ'; पंखांवरील नागाच्या चित्राने वेधले लक्ष

Sangli: इंगरूळमध्ये आढळला दुर्मिळ 'ॲटलस मॉथ'; पंखांवरील नागाच्या चित्राने वेधले लक्ष

विकास शहा

शिराळा : तालुक्यातील इंगरूळ येथील श्री शिवशंकर विद्यालयाच्या प्रांगणात जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असलेला दुर्मिळ 'ॲटलस मॉथ' आढळून आला. या पतंगाच्या पंखांच्या टोकावर हुबेहूब नागाच्या तोंडासारखी दिसणारी नैसर्गिक रचना असल्याने, हा निसर्गाचा अद्भुत नमुना पाहण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

श्रेयस तमुंगडे नावाच्या विद्यार्थ्याला हा पतंग दिसला. सुमारे १२ इंच आकाराचा हा पतंग दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेच्या आवारातील झाडाच्या फांदीवर विसावला होता. शिराळा तालुक्याची ओळख असलेल्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर या पतंगाच्या पंखांवर नागाचे चित्र दिसल्याने उपस्थितांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले. अनेकांनी या अनोख्या पतंगाचे फोटो काढले. काहीजणांनी गुगलवर शोध घेतला असता, हा दुर्मिळ 'ॲटलस मॉथ' असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. ए. पाटील आणि एस. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना या पतंगाविषयी माहिती दिली.

यानंतर, पांडुरंग नाझरे यांनी या पतंगाला शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयात नेले. तेथे वनरक्षक दत्तात्रय शिंदे आणि मोहन सुतार यांच्याकडे त्याला सुपूर्द करण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुर्मिळ जिवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले.

काय आहे 'ॲटलस मॉथ'चे वैशिष्ट्य?

'ॲटलस मॉथ'ची गणना जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये होते. त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी आणि किंचित लालसर असतो. पंखांवर नकाशाप्रमाणे पांढरे ठिपके असल्याने त्याला 'ॲटलस मॉथ' असे नाव मिळाले आहे.

याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट अवस्थेत असतानाच तो मोठ्या प्रमाणात अन्न खाऊन घेतो. त्यामुळे पतंग अवस्थेत त्याचे आयुष्य केवळ पाच ते सात दिवसांचे असते. या अल्पायुष्यात केवळ अंडी घालून तो आपला वंश पुढे नेतो.

हा निशाचर असून, रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतो. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात तो प्रामुख्याने दिसतो. दालचिनी, लिंबू, जांभूळ, पेरू यांसारख्या झाडांवरच त्याचा वावर असतो, जिथे तो अंडी घालतो. मादी एकावेळी १०० ते २०० अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेली अळी सुमारे ३५ ते ४० दिवस सतत पाने खाते आणि नंतर कोशात जाते. कोशातून पतंग बाहेर आल्यानंतर तो आपला जीवनक्रम पूर्ण करतो. हा दुर्मिळ जीव प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशियामध्ये आढळतो.

Web Title: Rare Atlas Moth found in Ingrul Sangli Snake pattern on wings attracts attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.