Sangli: मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयाचा थकबाकीमुळे वीज तोडली, कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 19:06 IST2025-03-19T19:06:07+5:302025-03-19T19:06:26+5:30
रुग्णालयाचे भवितव्य काळोखात

Sangli: मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयाचा थकबाकीमुळे वीज तोडली, कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
मिरज : आर्थिक अडचणीमुळे बंद असलेल्या मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे बंद केल्याने रुग्णालयाचे भवितव्य अंधारात गेले आहे. भवितव्य टांगणीवर असल्याने रुग्णालय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सुमारे १३० वर्षांच्या रुग्णसेवेची परंपरा असलेले ऐतिहासिक वॉन्लेस रुग्णालयातील सुमारे चारशे कर्मचारी गेले तीन वर्षे पगार नसल्याने हवालदिल आहेत. सुमारे ४० लाख थकबाकीमुळे रुग्णालयाचा वीज खंडित झाला आहे. सुमारे ७० लाख पाणीबिल थकीत आहे. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नसल्याने रुग्णालयाची बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
कामगारांचे सुमारे २५ कोटी रुपये वेतन थकीत आहे. या पार्श्वभूमीवर नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिझम डेव्हलपमेंट या संस्थेकडे रुग्णालय हस्तांतरणाचा सामंजस्य करार झाला आहे. मात्र, करार होऊनही तांत्रिक अडचणीमुळे वॉन्लेस सुरू झालेले नाही.
व्यवस्थापनाने दिली पोलिसांत तक्रार
वान्लेस रुग्णालयात परिचारिका व फिजिओथेरेपी महाविद्यालय चालविण्यात येते. गेले दोन आठवड्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने वसतिगृहातील विद्यार्थी अंधारात राहात आहेत. महाविद्यालयाच्या कार्यालयात आणलेला जनरेटरची कोणीतरी मोडतोड केल्याने व्यवस्थापनाने याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.