मिरज शासकीय रक्तपेढीत प्लेटलेट्स उपलब्ध होणार, रक्तघटक वेगळे करणारे ऑमिकस उपकरणही दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 15:57 IST2022-11-21T15:56:50+5:302022-11-21T15:57:18+5:30
प्लेटलेट्सच्या एका बॅगेची खासगी रक्तपेढ्यांमध्ये ११ हजार रुपये किंमत आहे. एकावेळी अनेक प्लेटलेट्स पिशव्यांची गरज भासल्यास लाखो रुपये खर्च होतात.

मिरज शासकीय रक्तपेढीत प्लेटलेट्स उपलब्ध होणार, रक्तघटक वेगळे करणारे ऑमिकस उपकरणही दाखल
सदानंद औधे
मिरज : मिरज शासकीय रुग्णालयात आता गरजू रुग्णांसाठी प्लेटलेट्स उपलब्ध होणार आहेत. खासगी रक्तपेढ्यात असलेली रक्तघटक वेगळे करण्याची यंत्रणा शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्याने गरजू रुग्णांचा फायदा होणार आहे.
डेंग्यू, व्हायरल ताप, यासह साथीच्या आजारांमुळे रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स (पांढऱ्या पेशी) कमी होतात. प्लेटलेट्स कमी झाल्याने रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन शरीरात रक्तस्रावाचा धोका असतो. यामुळे रुग्णाचे प्राण धोक्यात येतात. अशा रुग्णांना प्लेटलेट्स देण्यात येतात.
प्लेटलेट्सच्या एका बॅगेची खासगी रक्तपेढ्यांमध्ये ११ हजार रुपये किंमत आहे. एकावेळी अनेक प्लेटलेट्स पिशव्यांची गरज भासल्यास लाखो रुपये खर्च होतात. दात्यांच्या रक्तातून वेगळ्या केलेल्या प्लेटलेटस दिल्याने रुग्ण लवकर बरे होतात. अत्यवस्थ रुग्णांचाही मृत्यूचा धोका टाळता येतो. आता शासकीय रक्तपेढीतही प्लेटलेट्स उपलब्ध होणार असल्याने गरीब रुग्णांची सोय होणार आहे.
३५ लाखाचे ‘ऑमिकस’ उपकरण
शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत सुमारे ३५ लाख किमतीचे रक्तघटक वेगळे करणारे ‘ऑमिकस’ हे उपकरण आणण्यात आले आहे. दोन आठवड्यांत हे उपकरण कार्यान्वित होणार असल्याचे सांगण्यात आले.
प्लेटलेट्स रुग्णांसाठी गरजेची बाब
खासगी रक्तपेढीत असलेली सोय शासकीय रक्तपेढीत झाली आहे. रुग्णाला आवश्यकता असल्यास ॲमिकस या उपकरणाद्धारे रक्तदात्याच्या सुमारे तीन लिटर रक्त घेऊन त्यातील घटक वेगळे करून रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात सोडले जाते. वेगळे केलेले प्लेटलेट्स लगेचच रुग्णाला देण्यात येतात. ॲमिकस या उपकरणाद्धारे रक्तातील प्लाझ्मा काढून कोविड रुग्णांना देण्यात येत होता. प्लाझ्मा थेरेपी बंद झाली, मात्र प्लेटलेट्स रुग्णांसाठी गरजेची बाब आहे.