Sangli Politics: रोहित पाटलांच्या मतदारसंघात विरोधकांची तलवार म्यान; संजयकाका संभ्रमात, अजितराव गप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:00 IST2025-04-11T17:59:57+5:302025-04-11T18:00:42+5:30

दत्ता पाटील तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अनेक बदल पाहायला मिळाले. विधानसभेच्या पटलावर रोहित पाटील यांच्या नेतृत्वाचा उदय ...

opposition candidate Sanjaykaka Patil is confused while Ajitrao Ghorpade is silent In Rohit Patil Tasgaon Kavathemahankal constituency | Sangli Politics: रोहित पाटलांच्या मतदारसंघात विरोधकांची तलवार म्यान; संजयकाका संभ्रमात, अजितराव गप्प

Sangli Politics: रोहित पाटलांच्या मतदारसंघात विरोधकांची तलवार म्यान; संजयकाका संभ्रमात, अजितराव गप्प

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अनेक बदल पाहायला मिळाले. विधानसभेच्या पटलावर रोहित पाटील यांच्या नेतृत्वाचा उदय झाला. निकालानंतर सैरभैर झालेल्या विरोधकांनी मतदारसंघातील प्रश्नांवर आवाज उठविण्याऐवजी विरोधाची तलवार म्यान केल्याचे दिसत आहे. एकीकडे माजी खासदार संजय पाटील कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा? या संभ्रमात आहेत, तर दुसरीकडे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्याही राजकीय हालचाली थंडावल्या असून, तेही गप्प आहेत.

विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. सलग १० वर्षे लोकसभेच्या माध्यमातून जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना घोरपडे यांनी पाठिंबा दिला. दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधत राजकीय स्थित्यंतर केले; पण या दोहोंची जोरदार पिछेहाट करत आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित यांनी विधानसभेचा बालेकिल्ला भक्कम असल्याचे दाखवून देत निवडणूक जिंकली.

या निकालानंतर राजकीय समीकरणे बदलली. मतदारसंघाच्या समस्या मात्र अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. या समस्यांसाठी विरोधकांकडून अपेक्षित आवाज उठवला जात नसल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर संजय पाटील यांच्या वैयक्तिक कार्यक्रमाच्या गाठीभेटी सोडल्या, तर मतदारसंघातील कोणत्याही समस्येवर ते आवाज उठवताना दिसले नाहीत. दुसरीकडे घोरपडे हे निवडणुकीपुरतेच सक्रिय राजकारण करत असल्याच्या विरोधकांच्या टीकेवर ते स्वत:च शिक्कामोर्तब करताना दिसून येत आहेत. त्यामुळे मतदारसंघातील समस्यांवर आवाज उठवणार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे.

स्थानिक प्रश्नांवर बोलणार कोण?

स्थानिक पातळीवर मतदारसंघातील समस्यांवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील, सामाजिक कार्यकर्ते ज्योतिराम जाधव आणि मनसेचे जिल्हा सरचिटणीस अमोल काळे यांचा अपवाद वगळता कोणीही आवाज उठवत नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

सक्षम विरोधक हवाच!

विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांचा जवळपास एकतर्फी विजय झाला असला, तरी मतदारसंघात ताकदीच्या विरोधकाचीही तितकीच गरज आहे. रोहित पाटील हे सध्या मतदारसंघाच्या प्रश्नावर काम करत असले, तरी कोठे चुकतेय किंवा काय कमी पडतेय? हे दाखविण्यासाठी सक्षम विरोधक आवश्यकच आहे. अन्यथा विरोधक फक्त निवडणुकीपुरतेच दिसतात, अशी प्रतिमा व्हायला वेळ लागणार नाही.

Web Title: opposition candidate Sanjaykaka Patil is confused while Ajitrao Ghorpade is silent In Rohit Patil Tasgaon Kavathemahankal constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.