आदर्शवत!, सांगली जिल्ह्यातील कुंडलापूरमध्ये २१ वर्षांपासून "एक गाव, एक गणपती" उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 19:23 IST2025-09-01T19:23:46+5:302025-09-01T19:23:56+5:30
भजन, कीर्तन, पवाडे, लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, गावातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन

आदर्शवत!, सांगली जिल्ह्यातील कुंडलापूरमध्ये २१ वर्षांपासून "एक गाव, एक गणपती" उपक्रम
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या उत्तरेला असणाऱ्या घाटमाथ्यावरील ऐतिहासिक कुंडलापूर या गावात गेल्या एकवीस वर्षांपासूनची ''एक गाव,एक गणपती'' ही संकल्पना आजही कायम राबविली जात असल्याने इतर गावांना कुंडलापूर हे गाव आदर्शवत ठरत आहे. कोणताही गोंधळ अथवा तंटा नाही. अगदी डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा केला जातो.
कुंडलापूर या गावात एकवीस वर्षांपूर्वी मुख्य चौकात सर्वानुमते ''एक गाव, एक गणपती'' संकल्पना घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली, त्यानुसार ती संकल्पना आज अखेर जपली जात आहे. या ठिकाणच्या गणेशाची प्रतिष्ठापना व विसर्जनही अलिखित नियमानुसारच कोणताही डामडौल न करता पारंपरिक वाद्यांच्या गजरातच केले जाते. जेमतेम सजावट, जेमतेमच रोषणाईसह कार्यक्रमही पारंपरिक पद्धतीनेच केले जातात.
भजन, कीर्तन, पवाडे, लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, गावातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विसर्जनही वारकरी संप्रदायानुसारच टाळ मृदंगाच्या तालावर होते.या मंडळाच्या गणेश उत्सवासाठी गावातील आबालवृद्धासह महिलांचाही राबता असतो. अगदी गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाप्रसादाचे वाटप केले जाते. त्यामुळे येथील गणेश उत्सव हा इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे.