Sangli Municipal Election 2026: उमेदवारी अर्ज दाखलच्या पहिल्या दिवशी चौकशींचा मारा..!, ५७४ अर्जांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:32 IST2025-12-24T17:31:48+5:302025-12-24T17:32:10+5:30
दिवसभरात एकही अर्ज दाखल नाही, अनेक इच्छुकांच्या मनात शंकांची गर्दी

Sangli Municipal Election 2026: उमेदवारी अर्ज दाखलच्या पहिल्या दिवशी चौकशींचा मारा..!, ५७४ अर्जांची विक्री
सांगली : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला मंगळवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सहापैकी कोणत्याही विभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. यंदा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेबाबत अनेकांच्या मनात संभ्रमावस्था आहे. पहिल्याच दिवशी अनेक जण फक्त माहिती करून घेण्यासाठी आणि अर्ज घेण्यासाठी आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. सर्वच कार्यालयांत अर्जाची माहिती आणि इतर निवडणूक कामांची माहिती घेण्यात इच्छुकांचा आणि कार्यकर्त्यांचा पहिला दिवस गेला.
महापालिका निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्यासाठी सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात सहा ठिकाणी विभागीय कार्यालये सुरू केली आहेत. कुपवाड प्रशासकीय इमारतीत प्रभाग १, २, ८ मधील उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मिरज पालिका कार्यालयात प्रभाग ३, ४, ६. मिरज बालगंधर्व नाट्यगृहात प्रभाग ५, ७, २०, विश्रामबाग येथील महापालिका प्रभाग समिती दोनच्या कार्यालयात प्रभाग १५, १७, १८, १९, तरुण भारत क्रीडांगण येथे प्रभाग १२, १३, १४, १६ माधवनगर रोडवरील माळबंगला येथील अग्निशमन कार्यालयात प्रभाग ९, १०, ११ साठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
प्रत्येक विभागीय कार्यालयाकडे तीन ते चारच प्रभाग आहेत. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी यांनी विभागीय कार्यालयात प्रभागनिहाय व आरक्षणनिहाय अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था केली आहे. दिवसभरात इच्छुक उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी उमेदवारी अर्जाबाबत चौकशी करण्यासाठीच हजेरी लावली. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज कसा भरावयाचा, त्यासाठी कागदपत्रे काय लागणार, स्वत:सह सूचक, अनुमोदकांची थकबाकी, ना हरकत दाखले, शपथपत्रांची माहिती घेतली.
सीसीटीव्हीची नजर
अर्ज भरण्याच्या सहा विभागीय कार्यालयांसह आचारसंहिता कक्ष, निवडणूक खर्च कक्ष व इतर कार्यालयांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. मंगळवारपासून या कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू झाले आहे. निवडणुकीविषयीची प्रत्येक घटना आता कॅमेऱ्यात बंदिस्त होणार आहे.
दिवसभरात ५७४ अर्जांची विक्री
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी ५७४ अर्जांची विक्री झाली. सर्वाधिक १४२ उमेदवारी अर्जांची विक्री माळबंगला येथील विभागीय कार्यालय सहामधून झाली असून, त्याखालोखाल कुपवाडमधून १११ अर्जांची विक्री झाली. मिरज शहरातील दोन्ही कार्यालयातून कमी अर्जाची विक्री झाली आहे.
कार्यालयनिहाय अर्जांची विक्री
- कुपवाड : १११
- मिरज कार्यालय : ६३
- मिरज बालगंधर्व नाट्यगृह : ६५
- विश्रामबाग प्रभाग समिती दोन कार्यालय : ९९
- तरुण भारत क्रीडांगण कार्यालय : ९४
- माळबंगला कार्यालय : १४२