सांगलीत मुस्लिम बांधवांकडून गणरायाची प्रतिष्ठापना, २५ वर्षांची परंपरा कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:28 IST2025-08-28T18:28:06+5:302025-08-28T18:28:17+5:30
हिंदू-मुस्लिम एकतेची परंपरा

सांगलीत मुस्लिम बांधवांकडून गणरायाची प्रतिष्ठापना, २५ वर्षांची परंपरा कायम
सांगली : सांगलीमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेची परंपरा सांगली-मिरजेला फार पूर्वीपासून आहे. शिवाजी महाराजांसह इतर महामानवांनी दिलेल्या सर्वधर्म समभावाची जपणूक आज येथे केली जाते. येथील गणेश नगर परिसरातील मुस्लिम समाजाकडून दरवर्षी सार्वजनिक मंडळात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. २५ वर्षांची परंपरा असलेली प्रथा यंदाही कायम ठेवत मुस्लिम बांधवांकडून येथील सरकार ग्रुप मंडळात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सांगलीतील गणेश नगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने मुस्लिम बांधवांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत केले. आरती, पूजापाठ यांचे आयोजन सरकार ग्रुपमधील मुस्लिम बांधव दरवर्षीप्रमाणे यंदाही करणार आहेत.
यावेळी उत्तम मोहिते, ॲड. मेरी मोहिते, टिपू पटवेकर, इम्रान मुल्ला, सनाउल्ला बावचकर, युनूस कोल्हापुरे, जावेद मदारी, हमीद मदारी, मोहम्मद मदारी, नजीम मदारी, अकबर मदारी, अली नदाफ, आदी मान्यवर व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.