Sangli: मिरज सिव्हिलमध्ये शवागार बंद; मृतदेहांची हेळसांड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:40 IST2025-04-07T17:39:42+5:302025-04-07T17:40:07+5:30
मिरज : मिरज सिव्हिल रुग्णालयात रुग्णांसाठी सुविधांचा अभाव असून, शवागार गेले चार महिने बंद आहे. यामुळे सामान्यांची फरफट होत ...

Sangli: मिरज सिव्हिलमध्ये शवागार बंद; मृतदेहांची हेळसांड
मिरज : मिरज सिव्हिल रुग्णालयात रुग्णांसाठी सुविधांचा अभाव असून, शवागार गेले चार महिने बंद आहे. यामुळे सामान्यांची फरफट होत आहे. रुग्णालयात अतिदक्षता, नवशिशू विभाग, शीत शवगृह व शवविच्छेदन विभाग अद्ययावत करण्याची मागणी मिरज सुधार समितीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभाग अद्ययावत नसल्याने गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आहे. फ्रिजर बंद पडल्याने शीत शवगृह बंद आहे. यामुळे मृतदेह खासगी रुग्णालयात ठेवावे लागत आहेत. मृतदेह चार तासांत विघटन होण्यास सुरुवात होत असल्याने मृतांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. शवविच्छेदन विभाग अद्ययावत नाही, रुग्णालयात औषधांचा व रेबीज इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
नवशिशू विभागालगत प्रसूत मातांना राहण्यासाठी जागा नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना अरेरावी व मारहाणीचे प्रकारही होत आहेत. मिरज शासकीय रुग्णालयातील असुविधांबाबत स्वतंत्र व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन प्रकाश आबिटकर यांनी मिरज सुधार समितीला दिले.
यावेळी आमदार सुरेश खाडे यांच्यासह मिरज सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, संतोष जेडगे, जहीर मुजावर उपस्थित होते.