मिरज–बेळगाव विशेष रेल्वे गाडीचा प्रवाशांना भुर्दंड; पॅसेंजर दर्जा, तिकीट दर कमी करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:30 IST2025-10-06T18:30:15+5:302025-10-06T18:30:36+5:30
रेल्वे प्रवासी संघटनांचा दक्षिण-पश्चिम रेल्वेकडे पाठपुरावा

मिरज–बेळगाव विशेष रेल्वे गाडीचा प्रवाशांना भुर्दंड; पॅसेंजर दर्जा, तिकीट दर कमी करा
मिरज : महाराष्ट्र–कर्नाटक सीमा भागाला जोडणारी मिरज–बेळगाव विशेष गाडी नियमित करण्याची मागणी आहे. या गाडीला पॅसेंजर दर्जा देऊन तिकीट दर कमी करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वेकडे केली आहे. पॅसेंजर गाडीला विशेष गाडीचा दर्जा देण्यात आल्याने गेली दोन वर्षे प्रवाशांना दुप्पट तिकीट दराचा भुर्दंड सुरू आहे.
कोविड काळात मिरज–बेळगाव पॅसेंजर गाडी बंद करण्यात आली होती. कोरोनानंतरही ती पुन्हा सुरू न झाल्याने रेल्वे प्रवासी संघटनांनी पाठपुरावा केला. दोन वर्षांपूर्वी ही गाडी स्पेशल एक्सप्रेस म्हणून सुरू करण्यात आली. मात्र, ही गाडी सर्व स्थानकांवर थांबत असतानाही तिचे तिकीट दर एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच आहेत. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भार पडत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासी संघटनांनी दक्षिण-पश्चिम रेल्वेकडे ही गाडी पुन्हा पॅसेंजर दर्जा देऊन नियमित करण्याची व तिकीट दर कमी करण्याची मागणी केली आहे.
पॅसेंजर दर्जा लागू झाल्यास २५ रुपयांत बेळगाव
मिरज–बेळगाव विशेष गाडी मिरजेतून सकाळी ९:५० वाजता व सायंकाळी ५:३५ वाजता सुटते. मिरज ते उगार, कुडची व रायबाग या स्थानकांपर्यंत सध्याचे तिकीट दर ४५ रुपये आहेत, पॅसेंजर दर लागू झाल्यास हे फक्त १५ रुपये राहतील. मिरज ते घटप्रभा, गोकाक रोड, पाछापूर, सुळेभावी व बेळगावपर्यत सध्याचा तिकीट दर ७० रुपये आहे, पॅसेंजर दर्जा लागू झाल्यास तो केवळ २५ रुपयांत बेळगावला जाता येईल.
मिरज-बेळगाव पॅसेंजरच्या तिकीट दरात कपात झाल्यास छोटे व्यापारी, कामगार, विद्यार्थी व नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार आहे. - ॲड. ए. ए. काझी, रेल्वे प्रवासी संघ