शिराळ्यात विराज-रणधीर नाईक यांची ऐक्य एक्स्प्रेस, दोन मोठे गट एकत्र आल्याने इच्छुकांची संख्या वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 17:43 IST2022-02-25T17:41:58+5:302022-02-25T17:43:59+5:30
सध्या पंचायत समितीमध्ये आमदार मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख गटाची सत्ता आहे.

शिराळ्यात विराज-रणधीर नाईक यांची ऐक्य एक्स्प्रेस, दोन मोठे गट एकत्र आल्याने इच्छुकांची संख्या वाढली
कोकरूड : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने शिराळा तालुक्यात राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांची ऐक्य एक्स्प्रेस विविध गावांतील विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने धावत आहे. अशा परिस्थितीमध्ये इतर पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये मरगळ असल्याचे चित्र दिसून येत आहे.
येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत चारऐवजी मांगले, सांगाव, कोकरूड, पणूब्रे वारुण आणि वाकुर्डे बुद्रुक, असे पाच नव्याने जिल्हा परिषद गट तयार झाले आहेत, तर दहा पंचायत समिती गण असणार आहेत. सध्या पंचायत समितीमध्ये आमदार मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख गटाची सत्ता आहे.
या वेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख हे दोन्ही नेते आमदार मानसिंगराव यांच्या विरोधात भाजपची सत्ता मिळवतील, असे वातावरण होते; पण अचानक शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याची बातमी बाहेर पडल्याने सत्यजित देशमुख गटाशी हा मोठा धक्का बसला आहे.
रणधीर नाईक यांनी पक्ष प्रवेश होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे काम सुरू केले आहे. विराज नाईक व रणधीर नाईक हे दोन्ही नेते निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता जास्त आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने विराज नाईक आणि रणधीर नाईक हे हातात हात घालत विविध विकासकामांचे उद्घाटन करत जनतेशी संपर्क साधत आहेत.
दुसऱ्या बाजूला जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांना यापूर्वी मिळणारा निधी भाजपमध्ये गेल्यापासून म्हणावा तसा मिळालेला नाही, तसेच भाजपने ताकदही दिली नसल्याने भाजपच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांना मिळणाऱ्या निधीतून विकासकामे करावी लागत आहेत.
इच्छुकांची संख्या वाढली
सत्यजित देशमुख निवडणुकीच्या रिंगणात असणार का नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शिराळा तालुक्यात आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक, हे दोन मोठे गट एकत्र आल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तर भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि वंचित आघाडीकडे तुलनेने संख्या फारच कमी असणार आहे.