Sangli: शिराळ्यात गर्भवती ‘राॅटविलर’ कुत्री बिबट्याने पळवली, नागरिकांत भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:56 IST2025-10-01T15:56:16+5:302025-10-01T15:56:36+5:30
बंदोबस्त करण्याची मागणी

Sangli: शिराळ्यात गर्भवती ‘राॅटविलर’ कुत्री बिबट्याने पळवली, नागरिकांत भीतीचे वातावरण
शिराळा : शिराळा येथील एका फॉर्म हाऊसमधून बिबट्याने पहाटे राॅटविलर जातीची गर्भवती कुत्री पळवली. येथे दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अन्यथा, वनखात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
माजी सभापती ॲड. भगतसिंग नाईक यांच्या फॉर्म हाऊसमधून बिबट्याने गभर्वती कुत्री पळवून नेली. नागरिकांच्या समोर बिबट्याने बांधलेल्या कुत्रीवर हल्ला करून ती नेली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. शिराळा, औंढी, पाडळी, करमाळे, खेड गावात पाळीव प्राण्यांवर बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरू आहे. वनखात्याने या परिसरात पिंजरा बसवावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
बिबट्यामुळे दोन मृत्यू
गेल्या काही महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू तर चार जणांवर हल्ले झाले आहेत. दोनशेहून अधिक पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे मानव आणि वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासन सुरक्षिततेच्या उपाययोजना करणार की आणखी मृत्यू होण्याची वाट पाहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वनविभागाची गांधारीची भूमिका
शिराळा येथे बिबट्याचा धूमाकूळ सुरू असून बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र दररोज सुरू आहे. वनविभागाने मात्र गांधारीची भूमिका घेतली आहे. बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर वन विभागाकडून पंचनामे होत नाहीत. त्यामुळे वनविभागाने याची दखल घेतली नाही तर शिराळकरांचा उद्रेक होईल, असा इशारा शिराळा पंचायत समिती माजी सभापती ॲड. भगतसिंग नाईक यांनी पत्रकार परिषदेत केले.
नागरी वस्त्यांमध्ये दहशत
नाईक पुढे म्हणाले की, मोरणा धरण रोड, औढी रोड परिसर, करमाळे रोड, येथे बिबट्याचा वावर वाढला असून दररोज पाळीव कुत्री, शेळी, मेंढीवर हल्ला होत आहे. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्याठिकाणी हल्ले झाले तेथे वनविभाग भेटी देत नाही.