इस्लामपूर नगराध्यक्षपद ओबीसी पुरुषसाठी राखीव, खुल्या वर्गातील इच्छुकांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:00 IST2025-10-07T18:59:00+5:302025-10-07T19:00:09+5:30

आता नव्यानेच राष्ट्रवादी अजित पवार यांचा गट पालिकेच्या राजकारणात सक्रिय

Islampur Municipal Council's mayoral post reserved for OBC men, disappointment for open category aspirants | इस्लामपूर नगराध्यक्षपद ओबीसी पुरुषसाठी राखीव, खुल्या वर्गातील इच्छुकांची निराशा

इस्लामपूर नगराध्यक्षपद ओबीसी पुरुषसाठी राखीव, खुल्या वर्गातील इच्छुकांची निराशा

अशोक पाटील

इस्लामपूर : इस्लामपूर नगराध्यक्षपद ओबीसी पुरुष पडल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या गटाकडून विविध नेते सरसावले आहेत. तर त्यांच्या विरोधी विविध गटनेत्यांनी आपल्या समर्थकांची नावे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी पुढे केली आहेत. ओबीसी पुरुष पडल्याने खुल्या वर्गातील इच्छुक उमेदवारांच्या निवडणुकी अगोदरच दांड्या उडाल्या आहेत.

मागील निवडणुकीत विकास आघाडीचे निशिकांत पाटील यांनी खुल्या वर्गातून बाजी मारली. यावेळचे आरक्षण ओबीसी पुरुष पडले आहे. त्यामुळे खुल्या वर्गातील इच्छुक नेत्यांच्यात अस्वस्थता आहे. आ. जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि डॉ. संग्राम पाटील यांची नावे चर्चेत आली आहेत. त्यानंतर पीरअली पुणेकर, हिंदुराव माळी, बाळासाहेब कोळेकर आदी जयंत पाटील समर्थकांची नावे पुढे आली आहेत. तर भाजपमधून माजी विरोधी पक्षनेते यांचे नाव विक्रम पाटील यांनी सुचविले आहे. महाडिक गटाने सोमनाथ फल्ले यांचे नाव पुढे केले आहे.

आता नव्यानेच राष्ट्रवादी अजित पवार यांचा गट पालिकेच्या राजकारणात सक्रिय झाला असून अजित पवार गटाकडून माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे यांचे नाव माजी उपगनराध्यक्ष जयवंत पाटील यांनी पुढे केले आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी अ|ध्यक्ष मन्सूर मोमीन यांच्यासाठी आमदार इद्रिस नायकवडी यांनी फिल्डिंग लावलेली आहे. तर विकास आघाडीत असलेल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या गटाचे नाव अद्याप पुढे आलेले नाही.

अडचणीच्या काळात ज्यांनी विकास आघाडीला मदत केली. निवडून आल्यानंतर स्वत:चा गट निर्माण करण्याऐवजी विकास आघाडीला ताकद दिली. पूर्वीपासून पारंपरिक आमच्या सोबत असणाऱ्यांना एकत्रित करून स्थानिक पातळीवर नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवणार. विशेषत: माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार अभ्यासू आणि पालिकेतील अनुभवी व भाजप आणि विकास आघाडीचे एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते आहेत. तेच नगराध्यक्षपदाचे दावेदार होऊ शकतात. - विक्रमभाऊ पाटील, नेते, भाजप

आमचे नेते आ. जयंत पाटील इस्लामपूरचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरवतील. सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ओबीसी पुरुष इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. आम्हाला आ. जयंत पाटील यांचा निर्णय शिरसावंद्य राहील. शहराचे नगराध्यक्षपद आमच्याकडेच राहील. - शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष

Web Title: Islampur Municipal Council's mayoral post reserved for OBC men, disappointment for open category aspirants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.