आईच्या पोटातून जिगर घेऊन आलोय, पदासाठी कोणाच्या दारात जाणार नाही, संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:41 IST2025-10-09T19:40:19+5:302025-10-09T19:41:06+5:30
तासगावात काका गटाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा

आईच्या पोटातून जिगर घेऊन आलोय, पदासाठी कोणाच्या दारात जाणार नाही, संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका
तासगाव : “आईच्या पोटातून जिगर घेऊन आलोय, पदासाठी कोणाच्याही दारात जाणार नाही. कार्यकर्ताच माझा पक्ष आहे. माझा पक्ष गट नक्की नाही पण कार्यकर्त्यांसाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार आहे,” अशा ठाम शब्दांत माजी खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी तासगाव येथे झालेल्या कार्यकर्त्या संवाद मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली.
नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या संवाद मेळाव्यात तासगावमध्ये संजयकाकांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. “कोणत्याही पक्षाचे उपकार नकोत. माझ्या नादाला लागला तर उगवलेला सूर्य दिसणार नाही. कोणतेही पद नसले तरी ‘संजयकाका बोलतोय’ म्हटलं की अधिकारी काम टाळत नाहीत,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना उत्साह दिला.
युवा नेते प्रभाकर पाटील म्हणाले, “आजच्या मेळाव्याचा अंदाजच चुकला. अपेक्षेपेक्षा जास्त कार्यकर्ते आले. हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. संजयकाकांनी कधीही कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेतले नाहीत. संघर्ष येईल, पण घाबरायचं नाही. युवकांचे संघटन आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आपण ताकदीने पुढे जाणार आहोत.” राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉ. प्रताप पाटील यांनी संजयकाकांबद्दल आत्मीयता व्यक्त केली.
आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर संघर्ष नको असं काकांनी सांगितलं, पण आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. काकांना वाटेल ती मदत करण्यास मी सदैव तयार आहे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी मेळाव्यात काका घेतील ती कोणतीही भूमिका आम्हाला मान्य असल्याची ग्वाही दिली.
आरक्षण जाहीर झाल्यावर उमेदवार ठरवू
संजयकाका पाटील म्हणाले, “मी भ्रष्टाचार, व्याभिचारापासून नेहमी लांब राहिलो आहे. कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक निवडणुकीत संघर्ष करणार आहे. म्हैसाळ योजनेसाठी मी दोन हजार ९१ कोटी रुपये आणले, पण पूर्वीच्या प्रतिनिधींनी केलेल्या कामांचाही मी आदर करतो. मला पक्ष, आघाडी, चिन्ह यांची भीती नाही; माझं कोणी बिघडवू शकत नाही. निवडणुकीची तयारी सुरू करा. आरक्षण जाहीर झाल्यावर उमेदवार ठरवू. पक्ष नव्हे, कार्यकर्ताच माझा पक्ष आहे.