Sangli: मिरज शासकीय दूध डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर, जागेत शासकीय कार्यालये होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:31 IST2025-04-04T13:30:50+5:302025-04-04T13:31:14+5:30
वर्षापासून डेअरीचे कामकाज पूर्णपणे बंद

Sangli: मिरज शासकीय दूध डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर, जागेत शासकीय कार्यालये होणार
सदानंद औंधे
मिरज : मिरजेतील बंद पडलेल्या शासकीय दूध डेअरीच्या जागेवर मिरज पोलिस ठाणे व तहसीलदार कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ६५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली मिरजेतील शासकीय डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.
मुंबईनंतर सर्वात मोठी असलेली मिरजेतील शासकीय डेअरी गेल्या १५ वर्षांपासून बंद आहे. १९५७ साली स्थापन झालेल्या मिरजेच्या शासकीय दूध डेअरीत सुमारे दोन लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा होती. कालबाह्य झालेल्या या यंत्रणेची भंगारात विक्री झाली आहे. मिरज शहरालगत शासकीय दूध डेअरीची ४४ एकर जागा आहे. डेअरी बंद असल्याने या जागेपैकी आठ एकर जागा महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे व कर्मचारी वसाहतीसाठी मागण्यात आली आहे. मिरज तहसीलदार कार्यालय व न्यायालयासाठीही या जागेची मागणी आहे.
आगामी काळात डेअरीची जागा शासकीय कार्यालयांना देण्यात येणार असल्याने शासकीय दूध डेअरी इतिहासजमा होणार आहे. राज्यातील बंद अवस्थेतील शासकीय दूध योजना पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
मिरजेतील दूध डेअरीतून एकेकाळी दररोज एक्स्प्रेसला जोडून रेल्वे वॅगनमधून दूध मुंबईला पाठविण्यात येत होते. यासाठी डेअरीपर्यंत रेल्वे रूळ होते. काही काळ मराठवाड्यात अतिरिक्त होणारे दूध येत होते. डेअरी बंद पडल्यावर या दुधावर जिल्ह्यातील अन्य सहकारी दूध डेअरींमध्ये प्रक्रिया करण्यात येत होती.
मात्र, गेल्या वर्षापासून मराठवाड्यातून येणारे दूधही बंद झाल्याने शासकीय दूध डेअरीचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे. शासकीय दूध डेअरी आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. डेअरी बंद असल्याने इमारतीला अवकळा आली आहे. त्यामुळे मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेचा शासकीय कार्यालयांसाठी वापर करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
आठ एकर जागेची पोलिसांची मागणी..
मिरज डेअरीच्या जागेतील आठ एकर जागा पोलिस ठाणे व कर्मचारी वसाहतीसाठी मागणीचा प्रस्ताव पाठवला आहे. पोलिस ठाण्यासाठी ही जागा सोयीची असल्याचे महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले.