corona in sangli : मिरजमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडल्याने प्रशासनाची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:06 IST2020-05-13T17:04:45+5:302020-05-13T17:06:04+5:30
मिरजेतील होळीकट्टा परिसरातील ६८ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिका आरोग्य विभागाने या महिलेचे नातेवाईक व संपर्कातील लोकांचे नमुने तपासणीसाठी घेतले. मिरजेत पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने महापालिका व पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली.

corona in sangli : मिरजमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडल्याने प्रशासनाची धावपळ
मिरज : मिरजेतील होळीकट्टा परिसरातील ६८ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिका आरोग्य विभागाने या महिलेचे नातेवाईक व संपर्कातील लोकांचे नमुने तपासणीसाठी घेतले. मिरजेत पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने महापालिका व पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली.
होळीकट्टा परिसरातील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद केली आहेत. उपअधीक्षक संदीपसिंह गील व उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह पथकाने महिलेच्या घराच्या परिसरात पाहणी केली. महिलेस मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
कोरोनाबाधित वृद्ध महिला काही घरात धुणी-भांडी करीत असल्याने संबंधितांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. ही महिला वास्तव्य करीत असलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. संबंधित महिलेचे नातेवाईक व तिच्या संपर्कातील लोकांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
या परिसरात बाधितांना शोधून काढण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणासह इतर उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले. रात्री उशिरा आयुक्त नितीन कापडणीस यांनी परिसरास भेट देऊन पाहणी केली.